महाबळेश्वरमध्ये मुंबईच्या वयोवृद्ध पर्यटकाचा फिरता फिरता मृत्यू
महाबळेश्वरमध्ये मुंबईच्या वयोवृद्ध पर्यटकाचा फिरता फिरता मृत्यू
महाबळेश्वर प्रतिनिधी (विलास काळे )–
महाबळेश्वरला पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील हसमुख करमशी गाला (वय ७९, रा. ठाणे) या वयोवृद्ध पर्यटकाचा बुधवारी अचानक मृत्यू झाला. फिरण्याच्या ठिकाणीच घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
फिरतीदरम्यान अचानक प्रकृती बिघडली
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हसमुख गाला हे आपल्या तीन भावांसोबत – शांतीलाल करमशी गाला (६८, रा. परळ, मुंबई), मनीलाल गाला आणि चुनीलाल गाला – महाबळेश्वरला पर्यटनासाठी आले होते. चौघेही दुपारी ड्रीमलॅन्ड हॉटेल येथून बाहेर पडून महाबळेश्वर मंदिर, ईको पॉईंट व गार्डन परिसरात फिरले.
यानंतर त्यांनी वेण्णा लेकवर बोटींग करून सायंकाळी बाहेर पडत असताना सुमारे ४.१५ वाजता हसमुख गाला यांना अचानक चक्कर आली व ते जमिनीवर कोसळले.
रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
नातेवाईकांनी तातडीने त्यांना खाजगी वाहनातून ग्रामीण रुग्णालय, महाबळेश्वर येथे हलवले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
वृद्धापकाळ व नैसर्गिक मृत्यूची शक्यता
प्राथमिक तपासात हा मृत्यू वृद्धापकाळामुळे नैसर्गिक असल्याचे मानले जात असले तरी पर्यटन स्थळावर अचानक मृत्यू झाल्याने घटनेबाबत संशय निर्माण झाला आहे.
पोलिसांचा पुढील तपास सुरू
या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष शेलार पुढील तपास करीत आहेत.
महाबळेश्वरसारख्या पर्यटनस्थळी अचानक घडलेला हा मृत्यू पर्यटक व नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
Comments
Post a Comment