कुंभरोशी गावात गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात पार पडली – मुख्य गणेश मंडळ, हनुमान मंडळ व घरगुती गणपतींचा एकत्र सहभाग
प्रतापगड वार्ताहर –( अमित जाधव) :
कुंभरोशी गावात यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक भक्तिभाव आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडली. सकाळपासूनच गावभर उत्सवाची रंगत चढली होती. गावातील मुख्य गणेश मंडळाची मूर्ती, त्यानंतर हनुमान मंडळाची मूर्ती आणि घराघरातील सर्व गणेश मूर्तींचा एकत्रित समावेश असलेली ही मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात, टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि “गणपती बाप्पा मोरया – पुढच्या वर्षी लवकर या” या गजरात निघाली.
या मिरवणुकीत महिलांनी पारंपरिक पोशाख परिधान करून भजने म्हटली, टाळ-मृदुंगाच्या तालावर वादन केले. तरुणाईने नृत्य, गाणी आणि ढोल-ताशांच्या ठेक्यांवर जल्लोष केला. लहान मुले ते ज्येष्ठ नागरिक अशा सर्वांनीच उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने मिरवणुकीचे दृश्य अधिकच रंगतदार झाले. गावातील प्रत्येक घराघरातील गणपतींचा सामूहिक निरोप होत असल्याने वातावरण भावनिक झाले होते.
विसर्जन सोहळा पूर्णपणे शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. ग्रामपंचायत व स्थानिक मंडळांनी उत्तम व्यवस्थापन केल्यामुळे कुठलाही गोंधळ न होता संपूर्ण गावाच्या एकतेचे दर्शन या मिरवणुकीत घडले.
कुंभरोशी गावातील यंदाचा विसर्जन सोहळा हा भक्तिभाव, सांस्कृतिक परंपरा आणि ग्रामएकतेचे प्रतीक ठरला. गावातील मुख्य गणेश मंडळ, हनुमान मंडळ आणि घराघरातील गणपतींचा एकत्रित सहभाग या विसर्जन मिरवणुकीला खास बनवणारा ठरला. आगामी काळातही स्मरणात राहील असा हा अनोखा अनुभव सर्व ग्रामस्थांना मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
Comments
Post a Comment