पोलादपूर तालुक्यात प्रथमच रिव्हर राफ्टिंगचा शुभारंभसाहसी पर्यटनाचे नवे दार; स्थानिकांना रोजगाराची संधी
साहसी पर्यटनाचे नवे दार; स्थानिकांना रोजगाराची संधी
प्रकाश कदम
पोलादपूर प्रतिनिधी –
नरवीर ग्रुप नेहमीच विविध सामाजिक, सांस्कृतिक तसेच युवकाभिमुख उपक्रमांसाठी ओळखला जातो. या परंपरेला पुढे नेत आता त्यांनी “नरवीर अँडव्हेंचर अँड स्पोर्ट्स पोलादपूर” या उपक्रमांतर्गत तालुक्यात प्रथमच साहसी पर्यटनाची नवी दिशा दिली आहे. बाजीरे धरण ते लोहारे या मनोहर निसर्गरम्य परिसरात रिव्हर राफ्टिंगची सुरुवात झाली असून यामुळे पोलादपूर तालुक्याच्या पर्यटन इतिहासात एक नवीन पर्व सुरू झाले आहे.
मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन
या उपक्रमाचा शुभारंभ युवासेना कोअर कमिटी सदस्य विकासशेठ गोगावले यांच्या शुभहस्ते झाला. या वेळी माजी राजीप उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच तालुकाप्रमुख निलेश अहिरे, शहर प्रमुख सुरेश पवार, पोलादपूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा शिल्पा दरेकर, नरवीर ग्रुपचे प्रमुख रामदास कळंबे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पर्यटनाला चालना आणि रोजगारनिर्मिती
या उपक्रमामुळे पोलादपूर तालुक्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. आतापर्यंत नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळेच पर्यटक येथे आकर्षित होत होते. मात्र आता साहसी पर्यटनाचा नवा आयाम उपलब्ध झाल्याने पर्यटकांना अनोखा अनुभव घेता येणार आहे. घनदाट हिरवाई, शांत डोंगररांगा आणि निसर्गरम्य वातावरणात वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहात रिव्हर राफ्टिंग करताना पर्यटकांना रोमांचकारी अनुभव मिळेल.
त्याचबरोबर या उपक्रमामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगार आणि उद्योजकतेची नवी दारे उघडतील. प्रशिक्षक, मार्गदर्शक, सुरक्षिततेची साधने पुरवणारे तसेच पर्यटनाशी संबंधित इतर सेवाक्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.
पर्यावरणपूरक साहसाची जाणीव
नरवीर ग्रुपने या उपक्रमाद्वारे पर्यावरणपूरक पर्यटनाची जाणीव ठेवत रिव्हर राफ्टिंगचा मार्ग निश्चित केला आहे. सुरक्षिततेसाठी आवश्यक नियमावली, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, तसेच सर्व सुरक्षाव्यवस्था काटेकोरपणे पाळल्या जातील, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली. त्यामुळे पर्यटक निर्धास्तपणे आणि आत्मविश्वासाने या साहसी उपक्रमाचा आनंद घेऊ शकतील.
उपस्थित मान्यवरांचे प्रतिपादन
या वेळी बोलताना युवासेना नेते विकासशेठ गोगावले म्हणाले, “पोलादपूर तालुक्यातील पर्यटनाला नवी दिशा देणारा हा उपक्रम आदर्श ठरणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराची नवी संधी मिळेल आणि तालुका पर्यटन नकाशावर ठळकपणे उमटेल.”
माजी राजीप उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनीही या संकल्पनेचे कौतुक करताना, “साहसी पर्यटनाचा पोलादपूर तालुक्यातील हा आरंभ स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणार असून, पुढे याला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी सर्वांनी हातभार लावणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन केले.
नगराध्यक्षा शिल्पा दरेकर यांनीही या उपक्रमातून महिला उद्योजकता व स्थानिक सेवाक्षेत्राला नवी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
पोलादपूरचा पर्यटन नकाशा समृद्ध होणार
या उपक्रमामुळे रायगड जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला नवा आयाम लाभणार आहे. साहसी पर्यटन, नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक स्थळांचा संगम घडवून आणणारा पोलादपूर तालुका आता पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनण्याच्या तयारीत आहे.
👉 नरवीर अँडव्हेंचर अँड स्पोर्ट्सच्या रिव्हर राफ्टिंग उपक्रमामुळे पोलादपूरला पर्यटनाची आणि स्थानिकांना रोजगाराची नवी वाट मिळणार आहे.
Comments
Post a Comment