गवडी (ता. जावली) येथे ई-पिक पाहणी कॅम्प : शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
गवडी प्रतिनिधी
डिजिटल युगातील आधुनिक कृषी व्यवस्थापनाची दिशा दाखवणारा उपक्रम गवडी (ता. जावली) येथे प्रथमच राबविण्यात आला. पोलीस पाटील रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून ई-पिक पाहणी कॅम्प घेण्यात आला. या उपक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कॅम्पमध्ये कृषी सखी स्मिता कांबळे व कृषी सहाय्यक नारायण धनावडे यांनी मोलाचे सहकार्य केले. ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित प्रशिक्षण सत्रात शेतकऱ्यांना मोबाईलवर ई-पिक पाहणी अॅप कसे डाउनलोड करायचे, इंस्टॉल करायचे आणि माहिती नोंदवायची याचे प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर शेतकरी, कृषी अधिकारी आणि मार्गदर्शक बांधावर जाऊन पिक पाहणी प्रत्यक्ष केली.
पावसाचे वातावरण असूनही शेतकऱ्यांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. यावेळी सर्व्हर व्यवस्थित कार्यरत असल्याने प्रत्येक शेतकऱ्याची पिक पाहणी सहज पार पडली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचे वातावरण दिसून आले.
या उपक्रमात पोलीस पाटील रविंद्र चव्हाण, कृषी सखी स्मिता कांबळे व कृषी सहाय्यक नारायण धनावडे यांनी दिलेल्या माहितीचे शेतकऱ्यांनी मनापासून कौतुक केले. तसेच तलाठी कर्चे साहेब आणि कृषी अधिकारी कदम साहेब यांच्या वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनाने या उपक्रमाला बळ मिळाले.
शेतकऱ्यांनी व्यक्त केले की, “ई-पिक पाहणीची ही डिजिटल पद्धत वेळेची बचत करणारी, पारदर्शक आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे,” अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
Comments
Post a Comment