प्रवीण दरेकर यांना महाराष्ट्र स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी मंत्रीपदाचा दर्जा
प्रवीण दरेकर यांना महाराष्ट्र स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी मंत्रीपदाचा दर्जा
पोलादपूरचा सुपुत्र सहकार क्षेत्रातील तळपता तारा; राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव
प्रकाश कदम,
पोलादपूर प्रतिनिधी :
भाजपचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांची महाराष्ट्र स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, या पदाला मंत्रीपदाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यास मान्यता दिल्याने राज्यभरातून प्रवीण दरेकर यांचे कौतुक होत आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे विशेषतः पोलादपूर तालुक्यातील नागरिक व कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.
राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या इमारतींचा स्वयंपुनर्विकास करता यावा यासाठी शासनाने २४ एप्रिल २०२५ रोजी निर्णय घेतला होता. या प्रक्रियेत अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्यानंतर शासनाने अभ्यासगट नेमला होता. या अभ्यासगटाने १४ जुलै २०२५ रोजी विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सविस्तर अहवाल सादर केला.
या अहवालाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र स्वयंपुनर्विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या प्राधिकरणाचे पहिले अध्यक्ष म्हणून प्रवीण दरेकर यांची वर्णी लागली असून, त्यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे.
सहकार क्षेत्रातील दरेकर यांचा ठसा
पोलादपूर तालुक्यातील कोतवाल गावचे सुपुत्र प्रवीण दरेकर यांनी गेल्या अनेक वर्षांत सहकार क्षेत्रात आपली छाप उमटवली आहे. दीर्घकाळ मुंबई बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी राज्याच्या राजकारणात ठळक भूमिका निभावली. नुकतीच त्यांची पुन्हा विधान परिषद सदस्यपदी नियुक्ती झाली आहे.
मंत्रिमंडळात थेट प्रवेश न मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीशी नाराजी होती. मात्र त्यांच्या कामाचा सन्मान राखत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना या प्राधिकरणाचे अध्यक्षपद बहाल केले आणि मंत्रीपदाचा दर्जा दिला.
या नियुक्तीची बातमी जाहीर होताच संपूर्ण पोलादपूर तालुका उत्साहात आला आहे. गावोगावी कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी, मिठाईचे वाटप करून जल्लोष करण्यात येत आहे.
“दरेकर यांच्या नेतृत्वामुळे गृहनिर्माण क्षेत्राला नवा आयाम मिळेल. त्यांच्या अनुभवाचा नक्कीच फायदा होईल,” असा विश्वास स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील गृहनिर्माण स्वयंपुनर्विकास धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, सहकारी संस्थांना दिलासा आणि नागरिकांना थेट लाभ मिळवून देण्यासाठी दरेकर यांच्या अध्यक्षतेखालील प्राधिकरण काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या नियुक्तीने पोलादपूर तालुक्याचे नाव पुन्हा एकदा राज्यभर झळकले आहे.
Comments
Post a Comment