धनगर समाजाच्या आरक्षण लढ्यासाठी महाबळेश्वर तालुक्यातूनही पाठिंबायुवा नेते प्रशांत आखाडे यांचा निर्धार
धनगर समाजाच्या आरक्षण लढ्यासाठी महाबळेश्वर तालुक्यातूनही पाठिंबा
युवा नेते प्रशांत आखाडे यांचा निर्धार
जितेंद्र कारंडे
प्रतापगड प्रतिनिधी :
जालना येथे धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी दीपक बोराडे यांचे आमरण उपोषण दहाव्या दिवशी (२६ सप्टेंबर) पोहोचले असून, त्यांच्या आरोग्याची स्थिती चिंताजनक बनली आहे. या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर तालुक्यातील धनगर समाजानेही या आंदोलनाला जोरदार पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील धनगर समाज युवा नेते प्रशांत आखाडे यांनी समाज बांधवांना आवाहन करत स्पष्ट केले की,
“धनगर समाजाच्या न्यायहक्कासाठी सकल धनगर समाज महाबळेश्वर तालुका एकदिलाने उभा राहील. जालना येथे सुरू असलेले आमरण उपोषण केवळ एका व्यक्तीचा लढा नसून संपूर्ण समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन हा लढा यशस्वी करणे आवश्यक आहे.”
आखाडे यांनी पुढे सांगितले की, लवकरच तालुक्यातील समाज बांधवांची तातडीने बैठक बोलावली जाईल. या बैठकीत पुढील रणनीती आखून जालना येथील आंदोलनाला भक्कम पाठबळ देण्यात येईल.
दरम्यान, उपोषणकर्ते दीपक बोराडे यांची तब्येत खालावल्याने डॉक्टरांनी गंभीर इशारा दिला आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी (२६ सप्टेंबर) उपोषण स्थळी भेट देऊन बोराडे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधून समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय होईल, असे आश्वासन दिले आहे. तरीही बोराडे यांनी उपोषण थांबवण्यास नकार दिला असून, त्यांच्या निर्धारामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
या आंदोलनाला धार देण्यासाठी नुकताच राज्यव्यापी इशारा मोर्चा काढण्यात आला होता. हजारोंच्या संख्येने जमलेल्या समाज बांधवांनी ठाम आवाज दिला की –
“धनगर आणि धनगड हे एकच आहेत, म्हणून समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळालेच पाहिजे. अन्यथा राज्यभर अराजकतेचे वातावरण निर्माण होईल.”
बोराडे यांनी पुढील टप्प्यात १ ऑक्टोबर रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.
महाबळेश्वर तालुक्यातील युवा नेते प्रशांत आखाडे यांच्या पाठिंब्यामुळे या चळवळीला स्थानिक स्तरावरही नवे बळ मिळाले आहे. तालुक्यातील धनगर समाज या आरक्षणाच्या प्रश्नावर एकदिलाने उभा राहून राज्यव्यापी लढ्याचा भाग होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Comments
Post a Comment