ग्रामीण पर्यटन योजनेला गती मिळाल्यास पोलादपूर तालुक्याचा सर्वांगीण विकास शक्य , विकास आराखड्यात पोलादपूर पर्यटनाचा समावेश आवश्यक : स्थानिकांची मागणी
पोलादपूर प्रतिनिधी (प्रकाश कदम)
कोकणातील निसर्गरम्य डोंगर-दऱ्या, ऐतिहासिक वास्तू आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या गावांचा कायापालट कोकण ग्रामीण पर्यटन योजनेतून २०१७ मध्ये करण्यात आला. महाड व पोलादपूर तालुक्यातील पाच गावांमध्ये लाखो रुपयांची विकासकामे झाली असली तरी अद्याप अपेक्षित प्रमाणात पर्यटकांची रेलचेल निर्माण झाली नाही. त्यामुळे आता जिल्ह्याच्या विकास आराखड्यात पोलादपूर तालुक्यातील पर्यटनाचा अनिवार्य समावेश करून ठोस उपाययोजना करण्याची गरज भासत आहे.
पर्यटनाचा नवा अविष्कार – अस्सल कोकणाची ओळख
स्थानिक पर्यटनप्रेमी व पोलादपूर टुरिझमचे रामदास कळंबे यांनी सांगितले की, "इतर राज्यांच्या पर्यटन धोरणांचा सखोल अभ्यास करून जर ग्रामीण भागातील अस्सल कला, वास्तू व ऐतिहासिक ठेवा पर्यटकांना प्रत्यक्ष दाखविला, तर पर्यटनाचा नवा अविष्कार उलगडू शकतो. मात्र यासाठी स्थानिक पातळीवर ऐतिहासिक घटनांची माहिती व त्यामागील सांस्कृतिक वारसा पर्यटकांसमोर आणणे गरजेचे आहे."
गावांमध्ये पदपथ, वसतिगृह, स्वच्छतागृह यांसारखी कामे झाली असली तरी ऐतिहासिक वास्तूंचे जतन व नूतनीकरणावर भर दिल्यास पर्यटनाला चालना मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेलार मामा जन्मस्थळ व कोकणातील विस्मृतीत गेलेले वारसे
पोलादपूर तालुक्यातील कुडपण हे थंड हवामानाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. येथे पदपथ, पथदिवे यांची कामे झाली असली तरी पर्यटकांसाठी योग्य निवास व्यवस्था व जेवणाच्या सुविधा नसल्याने अनेकांना येथे थांबणे जमत नाही. यामुळे पर्यटनाची खरी ताकद अद्याप गाठली गेलेली नाही.
स्थानिक माजी सरपंच हनुमंत शेलार यांचे म्हणणे आहे की, शासनाने शेलार मामा जन्म स्थळ व घराचे जतन करावे, तसेच त्यांच्या शस्त्रांचे दालन उभारावे. त्याचप्रमाणे तालुक्यातील लहूळसे, उमरठ ,साखर सूर्याजी मालुसरे समाधी स्थळ,कोंढवी किल्ला ,कांगोरी गड, चंद्रगड,आणि इतर ऐतिहासिक स्थळांसह देवळे,सवाद,देवपूर,लोहारे, पोलादपूर येथील शिवमंदिरे यांचा विकास तातडीने व्हायला हवा. या ठिकाणी पर्यटकांची आकर्षणस्थळे निर्माण झाली, तर स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला हातभार
महाड तालुक्यातील शिवथरघळ गावांमध्ये सुरू असलेली विकासकामे हा एक आदर्श ठरू शकतो. पोलादपूरमध्ये अशाच प्रकारच्या पायाभूत सुविधा, निवास व अन्न व्यवस्था उपलब्ध झाली, तर येथे पर्यटकांची संख्या वाढेल. परिणामी गावांचा आर्थिक स्तर उंचावेल, दळणवळणाच्या सुविधा सुधारतील आणि ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास साध्य होईल.
शासनाने सकारात्मक पावले उचलण्याची मागणी
पोलादपूर आणि आसपासच्या गावांमध्ये पर्यटनाच्या अफाट संधी दडल्या आहेत. मात्र यासाठी शासनाकडून पर्यटन विभागाने धोरणात्मक पातळीवर काम करणे, स्थानिकांच्या मागण्या ऐकून घेणे आणि ऐतिहासिक-सांस्कृतिक ठेव्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे.
Comments
Post a Comment