महसुल सेवा पंधरवड्यानिमित्त महाबळेश्वर तालुक्यात १७ शिबिरांद्वारे विमुक्त जाती व भटक्या जमातींना लाभांचे वाटप
महसुल सेवा पंधरवड्यानिमित्त महाबळेश्वर तालुक्यात १७ शिबिरांद्वारे विमुक्त जाती व भटक्या जमातींना लाभांचे वाटप
विलास काळे,
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यामध्ये सुरू असलेल्या महसुल सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय अधिकारी वाई यांच्या सूचनांनुसार शनिवार, दि. 27 सप्टेंबर रोजी तालुक्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातींना शासकीय योजना व प्रमाणपत्रांचे थेट लाभ देण्यासाठी एकाच दिवशी तब्बल १७ शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
या विशेष उपक्रमाचा उद्देश म्हणजे तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या गावातच आवश्यक दाखले, प्रमाणपत्रे व योजना यांचा लाभ सुलभतेने मिळावा हा होता. तालुक्यातील विमुक्त व भटक्या जमातींची एकूण लोकसंख्या २,३८९ असून, यांपैकी २५ गावांमध्ये राहणाऱ्या लाभार्थ्यांना या शिबिरांद्वारे सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.
शिबिरांमध्ये लाभार्थ्यांना दिलेले दाखले व सेवा:
- शिधापत्रिका – ३३
- जात प्रमाणपत्र – १४
- उत्पन्न दाखला – ११२
- नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र – ११
- रहिवास प्रमाणपत्र – १७९
- अधिवास दाखला – २
- विवाह नोंदणी प्रमाणपत्र – ४
- जन्म व मृत्यू दाखला – ७१
- आयुष्मान भारत कार्ड – ५०
अशा प्रकारे विविध योजनांअंतर्गत एकाच दिवशी शेकडो कुटुंबांना तात्काळ लाभ मिळाला.
या शिबिरांना अधिकारी वर्गाची प्रत्यक्ष उपस्थिती लाभली. तहसिलदार श्री. सचिन मस्के यांनी कुंभरोशी येथे शिबिराला भेट देऊन लाभार्थ्यांना शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र यांचे वाटप केले. तर निवासी नायब तहसिलदार श्री. दीपक सोनावले हे गुरेघर येथे, आणि महसूल नायब तहसिलदार श्री. विनोद सावंत हे मोळेश्वर येथे हजर राहून विविध दाखले वाटप करून नागरिकांना लाभ मिळवून दिला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. रुपेश शिंदे (मंडळ अधिकारी महाबळेश्वर/तापोळा), श्री. संतोष मुळिक (मंडळ अधिकारी पाचगणी) यांच्यासह सर्व २५ गावांचे ग्राम महसूल अधिकारी यांनी परिश्रम घेतले. त्यांच्या समन्वयामुळे शिबिरांची अंमलबजावणी सुरळीत पार पडली.
या शिबिरांमुळे विमुक्त जाती व भटक्या जमातीतील कुटुंबांना एकाच दिवशी शासनाच्या विविध सेवा एका छताखाली उपलब्ध झाल्या. लोकांमध्ये या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त होत असून महसुल विभागाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment