महाबळेश्वरात मुसळधार पावसातही ओबीसी संघटनेचा धक्कादायक मोर्चा
महाबळेश्वरात मुसळधार पावसातही ओबीसी संघटनेचा धक्कादायक मोर्चा
मराठा आरक्षण अध्यादेशाविरोधात शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जोरदार आंदोलन; तहसीलदारांना निवेदन देत सरकारवर टीका
महाबळेश्वर प्रतिनिधी —
महाबळेश्वर तालुक्यात आज दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाची पर्वा न करता ओबीसी संघटनेने मराठा आरक्षण अध्यादेशाविरोधात जोरदार आंदोलन छेडले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरुवात झाली. त्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या भाषणांनी वातावरण पेटले आणि मुख्य बाजारपेठ मार्गे निघालेल्या मोर्चाने तहसील कार्यालयावर धडक दिली. या ठिकाणी तहसीलदार सचिन मस्के यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात ओबीसी समाजाचे स्पष्ट मत मांडण्यात आले आहे की, मराठा समाजाला आरक्षण देण्यास त्यांना हरकत नाही, मात्र ते आरक्षण ओबीसींच्या हक्कांवर गदा आणणारे नसावे. मराठा समाजाला ओबीसींमध्ये समाविष्ट करण्याचा सरकारचा निर्णय हा अन्यायकारक असून त्यामुळे मूळ ओबीसी समाजाच्या आरक्षणातील प्रतिनिधित्व धोक्यात येईल, असा आरोप करण्यात आला. तसेच सरकारने आरक्षणासाठी विशिष्ट अटी घालणे अपेक्षित असताना सरसकट निर्णय घेतला असल्याचा आरोपही करण्यात आला.
या प्रसंगी सातारा जिल्हाध्यक्ष भरत लोकरे यांनी सरकारवर थेट टीका करताना म्हटले की, “राज्य सरकार सर्वांना दिशाभूल करत आहे. ओबीसी समाज सुशिक्षित झाला आहे आणि त्याला सध्या सुरू असलेल्या अन्यायकारक परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे आम्ही आता रस्त्यावर उतरून तसेच न्यायालयीन लढाई देऊन आपले हक्क मिळवणार आहोत.”
मोर्चादरम्यान ‘एकच पर्व – ओबीसी सर्व’, ‘जाती निहाय जनगणना झालीच पाहिजे’, ‘जिसकी संख्या भारी, उतनी उसकी भागिदारी’ अशा घोषणा देत आंदोलकांनी वातावरण ढवळून काढले. मुसळधार पावसामुळे काही काळ अडचण निर्माण झाली असली तरी आंदोलकांचा जोश कमी झाला नाही.
या आंदोलनात ओबीसी संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल लोहार, नगरसेवक संदीप साळुंखे, संदीप आखाडे, चंद्रकांत जंगम, काशिनाथ टेंबे, इक्बाल वारुणकर, ॲड. विठ्ठल कदम, प्रशांत कात्रट, प्रशांत आखाडे, कुमार शिर्के, आयुब वारुणकर, अनिल ढेबे यांच्यासह मोठ्या संख्येने ओबीसी बांधव सहभागी झाले होते.
महाबळेश्वरात भरपावसात झालेल्या या आंदोलनामुळे शहरात वातावरण तापले असून, आगामी काळात हा वाद अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
Comments
Post a Comment