पोलादपूर तालुक्यात माकडांचा धुमाकूळ – शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त, नागरिक त्रस्त; वनविभागाच्या हस्तक्षेपाची मागणी
पोलादपूर तालुक्यात माकडांचा धुमाकूळ – शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त, नागरिक त्रस्त; वनविभागाच्या हस्तक्षेपाची मागणी
प्रतिनिधी – पोलादपूर
पोलादपूर तालुक्यात सध्या माकडांच्या दहशतीने नागरिक, शेतकरी आणि व्यापारी अक्षरशः हैराण झाले आहेत. जंगलातून बाहेर पडलेल्या माकडांच्या टोळक्यांनी गावोगाव शिरकाव करून शेती, घरे आणि दुकाने उद्ध्वस्त करण्याचा सिलसिला सुरू ठेवला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून काहींनी या त्रासाला कंटाळून शेतीच सोडून दिल्याची धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
🔹 शेतीवर थेट आघात
माकडांच्या टोळक्यांमुळे शेतातील पिके उद्ध्वस्त होत आहेत. भात, भाजीपाला आणि फळबागा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांचा खर्च पाण्यात जात आहे.
🔹 घरा-घरात घुसखोरी
ही माकडे थेट गावांमध्ये घुसून घरांची पत्रे उचकटतात, पत्र्यावर उड्या मारून घरांचे नुकसान करतात. घरात घुसून अन्नधान्य, फळे व इतर वस्तूंची नासधूस केली जाते.
🔹 लहान मुलांवर धोका
लहान मुलांच्या हातातील दप्तरं, खाऊचे डबे हिसकावून नेण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेबद्दल पालकांमध्ये मोठी भीती पसरली आहे.
🔹 व्यापाऱ्यांचे नुकसान
फळ विक्रेते व दुकानदारांना माकडांचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. बाजारपेठेत येऊन माकडे थेट फळांच्या टपऱ्यांवर तुटून पडतात आणि मोठ्या प्रमाणात नुकसान करतात.
🔹 वाहनांची तोडफोड
रस्त्यावर उभी असलेल्या वाहनांच्या आरशांची तोडामोड, छतांवर उड्या मारणे यामुळेही नागरिकांच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत.
यामुळे ग्रामीण भागातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, लोकांचा संयम सुटू लागला आहे. स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी बांधवांनी वारंवार वनविभागाचे लक्ष वेधले तरी अद्याप ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत.
"माकडांचा हा वाढता त्रास तातडीने रोखला नाही तर शेती व ग्रामीण अर्थव्यवस्था धोक्यात येईल. वनविभागाने विशेष मोहिम राबवून माकडांना जंगलात परत हाकलावे, अन्यथा परिस्थिती गंभीर होईल," अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
-
Comments
Post a Comment