लढवय्या कार्यकर्त्याचा अंत : हनुमंत दळवींच्या जाण्याने देवळे विभाग शोकाकुल
लढवय्या कार्यकर्त्याचा अंत : हनुमंत दळवींच्या जाण्याने देवळे विभाग शोकाकुल
पोलादपूर प्रतिनिधी ( प्रकाश कदम)
पोलादपूर तालुक्यातील दाभिल गावचा लढवय्या कार्यकर्ता आणि समाजाशी नाळ घट्ट जोडून ठेवणारे हनुमंत दळवी यांचे निधन हे देवळे विभागासाठी मोठे दुःख आहे. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण परिसर दुःखसागरात बुडाला आहे.
शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या हनुमंत दळवी यांनी बालपणापासूनच संघर्षमय जीवनाला सामोरे जात शेतात नवनवीन प्रयोग करून दाखवले. केळी, स्ट्रॉबेरीसारखी पिके दाभिळसारख्या दुर्गम भागात घेऊन त्यांनी आदर्श शेतकरी म्हणून लौकिक मिळवला. त्यांच्या मेहनतीसाठी आणि प्रयोगशीलतेसाठी त्यांना शेतकरी पुरस्कारही मिळाला होता.
राजकीय आयुष्यात त्यांनी सुरुवातीला माजी आमदार स्व. माणिकराव जगताप यांचे कट्टर समर्थक म्हणून काँग्रेसमध्ये कार्य केले. त्या काळी शिवसेना सत्तेत असूनही त्यांनी न झुकता देवळे विभागात काँग्रेस जिवंत ठेवली. पुढे गावच्या विकासाचा विचार करून त्यांनी तत्कालीन आमदार भरत गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या चिरंजीव अनिल दळवी यांना शिवसेनेने पंचायत समितीची उमेदवारी दिली. आज अनिल दळवी हे शिवसेनेचे युवा कार्यकर्ते म्हणून त्यांचा वारसा पुढे नेत आहेत.
समाजकार्य आणि परमार्थिक क्षेत्रातही हनुमंत दळवी यांनी मोठा ठसा उमटविला. ते उत्तम गवई कार होते तसेच कोकणी संस्कृतीतील जाखडी नृत्य (बाळ्या डान्स) याचा वारसा त्यांनी जिवंत ठेवला. पारायण, धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग असे. आई-वडिलांप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि आदरभाव ही तरुणांसाठी प्रेरणादायी ठरली. मुंबईत नोकरीची संधी मिळूनही आई-वडिलांची सेवा करण्यासाठी त्यांनी गावात राहणे पसंत केले.
सामाजिक संबंधांमध्ये ते विनम्र आणि जिव्हाळ्याचे राहिले. त्यामुळे नातेवाईक, मित्रमंडळी आणि ग्रामस्थांमध्ये ते लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाने केवळ देवळे विभागच नव्हे, तर संपूर्ण पोलादपूर तालुका शोकाकुल झाला आहे.
त्यांच्या स्मरणार्थ ग्रामस्थांनी मंदिरासमोर दीपमाळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या उत्तरकार्याचे आयोजन २५ सप्टेंबर रोजी दाभिळ येथील राहत्या घरी करण्यात आले असून गुरुवर्य रघुनाथ महाराज मोरे यांचे कीर्तन ठेवण्यात आले आहे.
हनुमंत दळवींच्या जाण्याने देवळे विभागाने खऱ्या अर्थाने लढवय्या, शेतकरी, कार्यकर्ता आणि समाजसेवक गमावला आहे.
Comments
Post a Comment