महाबळेश्वरात स्वच्छता पंधरवाड्याची उत्साहपूर्ण सुरुवात
महाबळेश्वरात स्वच्छता पंधरवाड्याची उत्साहपूर्ण सुरुवात
महाबळेश्वर प्रतिनिधी (विलास काळे )
दि. १७ सप्टेंबर
केंद्र शासनाच्या ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरीषदेच्या वतीने स्वच्छता पंधरवाड्याची आज उत्साहपूर्ण सुरुवात करण्यात आली. दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत शहरात विविध स्वच्छता जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार असून, यामधून नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जाणीव निर्माण करणे व स्वच्छतेचा व्यापक प्रचार करणे हे उद्दिष्ट आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ गिरीस्थान प्रशाला येथे करण्यात आला. या ठिकाणी विद्यार्थ्यांसह उपस्थित सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली. नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. योगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमाला वरिष्ठ लिपिक श्री. आबाजी ढोबळे, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी श्री. अमित माने, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता श्री. प्रदीपकुमार बोरगे, संगणक अभियंता श्री. मंगेश माने, आरोग्य निरीक्षक श्री. प्रमोद कुंभार, स्थापत्य अभियंता श्री. मुरलीधर धायगुडे, वृक्षाधिकारी श्री. कल्याण हिवरे, लेखापाल ज्ञानेश्वर मोहिते, लेखापरीक्षक श्री. सचिन कदम, स्वच्छता मुकादम श्री. मनोज चव्हाण व अयुब वारुणकर, तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि हिलदारी प्रमुख श्री. राम भोसले व त्यांची टीम उपस्थित होती.
पंधरवड्याच्या काळात शहरात अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. महिलांसाठी कचरा वर्गीकरणाबाबत सामुदायिक बैठका, शालेय विद्यार्थ्यांना कचरा व्यवस्थापनविषयक जनजागृती सत्रे, ‘रेड डॉट’ बैठका, स्वच्छता अभियान, एकल वापर प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती व दंडात्मक कार्यवाही, सार्वजनिक ठिकाणी पथनाट्य, स्वच्छता फेरी, तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांची शासकीय योजनांमध्ये नोंदणी व त्यांचा सन्मान या सर्व उपक्रमांचा यात समावेश आहे.
याशिवाय, शहरातील सर्व शाळा, हॉटेल व्यवसायिक, सामाजिक संस्था, विविध संघटना, शासकीय कार्यालये व स्थानिक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. योगेश पाटील यांनी केले. त्यांनी सांगितले की, “स्वच्छ, सुंदर आणि हरीत महाबळेश्वर घडवण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अनिवार्य आहे. सामूहिक प्रयत्नांतूनच शहराची ओळख अधिक उज्वल होईल.”
स्वच्छता पंधरवड्याच्या या अभियानामुळे महाबळेश्वर शहरात स्वच्छतेबद्दल नवीन उर्जा निर्माण होणार असून, नागरिकांच्या सहकार्याने शहराला आदर्श पर्यटनस्थळ व पर्यावरणपूरक शहर बनविण्याकडे महत्त्वपूर्ण पाऊल टाकले जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Comments
Post a Comment