सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्यातील कामे सप्टेंबरअखेर सुरू – जिल्हाधिकारी संतोष पाटील
सातारा प्रतिनिधी :
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्यातील सर्व कामे येत्या सप्टेंबरअखेर सुरू व्हावीत आणि सध्या प्रगतीपथावर असलेली कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण व्हावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या. तसेच नवीन सुरु होणारी कामे माहे मेपर्यंत पूर्ण करावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात पर्यटन विकासाच्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी पाटील यांनी संबंधित विभागांना सूचना दिल्या. या बैठकीस उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात, कार्यकारी अभियंते श्रीपात जाधव, राहूल अहिरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी पाटील म्हणाले की, “कामांसाठी आवश्यक असलेली ना हरकत प्रमाणपत्रे तातडीने पाठवावीत. काही कामांमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन एजन्सींसोबत समन्वय साधावा.”
जिल्ह्यातील महत्त्वाच्या पर्यटन विकास आराखड्यांचा आढावा घेताना जिल्हाधिकाऱ्यांनी विशेषतः काही प्रकल्पांवर भर दिला. त्यामध्ये –
- अजिंक्यतारा किल्ल्याचे जतन व संवर्धन, परिसराचे सुशोभीकरण व पायाभूत सुविधा उभारणी,
- संगम माहुली व क्षेत्र माहुली येथील सुशोभीकरण आराखडा,
- तळबीड (ता. कराड) येथे उभारण्यात येणारा स्वराज्य सृष्टी प्रकल्प,
- कराड येथील प्रितीसंगम सुशोभीकरण आराखडा यांचा समावेश होता.
या सर्व आराखड्यांचे प्रस्ताव सादर करून नियोजित मुदतीत कामे पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना दिले.
Comments
Post a Comment