कुंभारोशी येथे “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” अंतर्गत ग्रामसभा
कुंभारोशी येथे “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” अंतर्गत ग्रामसभा
कुंभारोशी प्रतिनिधी :
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” अंतर्गत कुंभारोशी येथे ग्रामसभा उत्साहात पार पडली. या ग्रामसभेत गावातील लोकप्रतिनिधी, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रातील अधिकारी, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.
ग्रामसभेत लोकसहभाग वाढवणे, ग्रामपंचायतीच्या कामाचे स्वयंमूल्यांकन करणे, गावाच्या विकासासाठी प्राधान्यक्रम ठरवणे, पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करणे या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. तसेच अभियानातील पुरस्कार योजना व प्रोत्साहनात्मक उपक्रमांबद्दल माहिती देण्यात आली.
- गावाच्या गरजांची नोंद व प्राधान्य ठरवणे : रस्ते, पाणीपुरवठा, सार्वजनिक सुविधा, स्वच्छता, आरोग्य व शिक्षणाच्या क्षेत्रात सुधारणा आवश्यक असल्याचे ग्रामस्थांनी व्यक्त केले.
- पारदर्शक प्रशासन : ग्रामपंचायतीच्या चालू व पूर्ण झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. खर्चाचा हिशेब व कामाची प्रगती याबाबत ग्रामस्थांना माहिती देण्यात आली.
- प्रोत्साहन व पुरस्कार : उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या पुरस्कार योजनांबद्दल माहिती देऊन गावकऱ्यांना सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
- अभियानाचा कालावधी : १७ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या अभियानाचा समारोप ३१ डिसेंबर रोजी होणार असून, त्या कालावधीत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी योजना राबविण्याचा संकल्प ग्रामसभेत करण्यात आला.
ग्रामसभेस सरपंच कांचनाबाई सावंत, ग्रामपंचायत सदस्य सचिन सपकाळ, माजी सरपंच सखाराम ढेबे, माजी सरपंच रविकांत मोरे, पोलीस पाटील सतीश जंगम, छत्रपती शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक मोझर सर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका काळे मॅडम, आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामसभेच्या माध्यमातून गावकऱ्यांनी शासनाच्या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवत गावाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
Comments
Post a Comment