इंटरनेट सेवा बंद; सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कुंभरोशी शाखेचे तीन तेरा
प्रतापगड प्रतिनिधी (अमित जाधव):
महाबळेश्वर तालुक्यातील पश्चिम भागात शेतकरी, लघुउद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी आधारस्तंभ ठरलेली सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा, कुंभरोशी, गेल्या काही दिवसांपासून इंटरनेट सेवेशिवाय ठप्प अवस्थेत आहे. या शाखेवर सुमारे २५ ते ३० गावांचा आर्थिक व्यवहार अवलंबून असताना, सततच्या इंटरनेट बिघाडामुळे ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
पासबुक प्रिंट करणे, पैसे जमा करणे, व्यवहार पाठवणे किंवा सरकारी योजना यासंबंधीचे काम करायला येणाऱ्या ग्राहकांना कर्मचाऱ्यांकडून सरळ उत्तर मिळते – “इंटरनेट नाही”.
गेल्या पाच दिवसांपासून सलग सेवा बंद असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मात्र, बँक प्रशासनाकडून अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचललेले दिसत नाही.
कुंभरोशी शाखा ही संपूर्ण पश्चिम भागासाठी एकमेव बँक आहे.
शेतकरी, व्यापारी, महिला बचत गट, तरुण उद्योजक—सर्वांचे खाते याच शाखेत आहे.
दिवसेंदिवस ग्राहकांच्या ओळी लागतात, पण व्यवहार मात्र ठप्प राहतात.
ग्राहकांनी कर्मचाऱ्यांना वारंवार पर्यायी इंटरनेट सेवा (जिओ, बीएसएनएल) घेण्याची सूचना केली. मात्र, “आमच्या हातात काही नाही, आदेश वरून नाही” असे उत्तर देत जबाबदारी झटकली जाते.
एटीएमची मागणीही रखडली
स्थानिकांकडून अनेकदा एटीएमची मागणी करण्यात आली. पण त्यावरसुद्धा कोणतीही हालचाल न झाल्याने लोकांना रोख रक्कम काढण्यासाठी शहर गाठावे लागते. प्रवासाचा खर्च, वेळ आणि कामाचे नुकसान या सर्वांचा त्रास ग्राहकांना सहन करावा लागतो.
बँक ही ग्रामीण भागातील लोकांसाठी आर्थिक जीवनरेखा असते. पण कुंभरोशी शाखेच्या बाबतीत प्रशासनाचे उदासीन धोरण स्पष्टपणे दिसते.
ग्राहकांनी केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष.
वेळेवर इंटरनेट सुविधा न देणे.
पर्यायी उपाय न शोधणे.
यामुळे लोकांच्या पैशांवरच गंडांतर निर्माण झाले आहे.
सध्या संतप्त ग्राहकांचा संयम सुटत चालला आहे. “दररोज वेळ वाया घालवूनही काम होत नाही. बँकेचे उच्चाधिकारी या समस्येकडे दुर्लक्ष करत असतील तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
Comments
Post a Comment