किसनवीर साखर कारखान्याची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली; शेतकरीहित जपण्याचा संकल्प
किसनवीर साखर कारखान्याची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली; शेतकरीहित जपण्याचा संकल्प
भुईंज प्रतिनिधी :
किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना, भुईंज येथे ५४ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा खासदार नितीन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण आणि उत्स्फूर्त वातावरणात पार पडली. या सभेला ऊस उत्पादक शेतकरी बांधवांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
सभेत गतवर्षातील कामकाजाचा व कारखान्याच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी ऊस उत्पादक शेतकरी बांधवांचे हित, उत्पादनवाढ, ऊस दरातील स्थिरता, कारखान्याची आर्थिक स्थिती तसेच येत्या काळासाठी आखण्यात आलेल्या विकासात्मक धोरणांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. शेतकऱ्यांचा विश्वास आणि सहभाग लक्षात घेऊन निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्याची ग्वाही कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
या अधिवेशनाला खंडाळा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व्ही. जी. पवार, खंडाळा कारखान्याचे व्हा. चेअरमन राजेंद्र तांबे, किसनवीरचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, कार्यकारी संचालक, सर्व मान्यवर संचालक मंडळ सदस्य, ऊस उत्पादक शेतकरी आणि विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सभेत बोलताना मान्यवरांनी, किसनवीर सहकारी साखर कारखान्याची परंपरा आणि शेतकऱ्यांचा विश्वास हाच कारखान्याच्या यशाचा पाया असल्याचे अधोरेखित केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, ऊस उत्पादनवाढीसाठी मार्गदर्शन, शेतकऱ्यांच्या गरजांनुसार धोरणात्मक निर्णय आणि सामाजिक जबाबदारी या चार स्तंभांवर कारखान्याची भावी वाटचाल उभी राहील, असा विश्वास या सभेत व्यक्त करण्यात आला.
किसनवीर कारखान्याने गेल्या काही वर्षांत प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावला असून, ऊस उत्पादक बांधवांच्या सहकार्याने ही सहकारी चळवळ अधिक सक्षम आणि सबळ करण्याचा निर्धार या अधिवेशनातून करण्यात आला.
Comments
Post a Comment