महाबळेश्वरात विसर्जनात गोंधळ : सहा गणेशोत्सव मंडळांविरुद्ध गुन्हे
महाबळेश्वर प्रतिनिधी (विलास काळे)
महाबळेश्वर शहरात सातव्या दिवशीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे व डॉल्बीच्या दणदणाटामुळे गोंधळ उडाला. पोलिसांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात डीजे व लेझर शोचा वापर केला. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. अखेर पोलिसांनी सहा गणेशोत्सव मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल करून डॉल्बी साहित्य जप्त केले.
२ सप्टेंबर रोजी झालेल्या विसर्जन मिरवणुकीत २१ सार्वजनिक मंडळांचा सहभाग होता. यापैकी श्रीकृपा मित्रमंडळ (कोळी आळी), गोल्डन मित्र मंडळ (डॉ. साबणे रोड), गजराज मित्र मंडळ (नगरपालिका हौसिंग सोसायटी), अंबिका मित्र मंडळ (अंबिका सोसायटी), श्री प्रसन्ना मित्र मंडळ (मरिपेठ) आणि शिवसम्राट श्रीगणेश मित्र मंडळ (आंबेडकर चौक) या सहा मंडळांनी डॉल्बीचा वापर केला. त्यामुळे मंडळांचे पदाधिकारी आणि डॉल्बी चालकांविरुद्ध सार्वजनिक शांतता भंग व ध्वनीप्रदूषण प्रतिबंधक कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
घटनास्थळी आढळलेली डॉल्बी सिस्टीम, जनरेटर व अन्य साहित्य पोलिसांनी जप्त केले असून आरोपींचे जबाब नोंदवले गेले आहेत. पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिस ठाण्याकडून सांगण्यात आले.
यावेळी पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी आधीच कडक कारवाईचा इशारा दिला होता. तरीदेखील काही मंडळांनी नियमांचे उल्लंघन केले. परिणामी शहरातील ध्वनीप्रदूषणाचा पारा वाढला.
दरम्यान, उर्वरित १५ सार्वजनिक मंडळे तसेच ग्रामीण भागातील मंडळांनी प्रशासनाचे नियम पाळत पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन केले. त्यांच्या शिस्तबद्धतेचे विशेष कौतुक जिल्हा पोलिस अधीक्षक, वाई उपविभागीय अधिकारी आणि महाबळेश्वर पोलिस निरीक्षक बापुसाहेब सांडभोर यांनी केले.
पोलिस प्रशासनाचा इशारा :
“पुढील काळात डीजे व डॉल्बीचा वापर करून नियम मोडणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही. कठोर कारवाई टाळता येणार नाही,” असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
Comments
Post a Comment