साताऱ्यात मध्यरात्री युवकावर जीवघेणा हल्लातीन अल्पवयीन ताब्यात; कारण अद्याप अस्पष्ट, परिसरात भीतीचे सावट
सातारा प्रतिनिधी –
साताऱ्यातील शाहूपुरी परिसरात झालेल्या एका भीषण हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. ३१ जुलै रोजी रात्री ज्ञानेश्वर जगदाळे (वय ४९, रा. शाहूपुरी) यांच्यावर दोन अज्ञात तरुणांनी आझादनगर बस स्टॉपजवळ जीवघेणा हल्ला केला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, हल्लेखोरांची निर्घृण मारहाण स्पष्टपणे दिसून येते.
व्हिडिओमध्ये दोघे तरुण जगदाळे यांना बेदम मारहाण करताना दिसतात. या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर सध्या साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर शाहूपुरी पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला.
प्राथमिक तपासादरम्यान पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. मात्र, हल्ल्याचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. पीडित जगदाळे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पुढील तपास सुरू आहे.
या प्रकारामुळे शाहूपुरी परिसरात भीती व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी पोलिसांकडे या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिस मात्र हल्ल्याच्या पार्श्वभूमीचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज व स्थानिक माहितीदारांचा वापर करून सखोल तपास करत आहेत.
Comments
Post a Comment