पोलादपूर तालुक्याचे सुपुत्र, इतिहास अभ्यासक रवींद्र मालुसरे राज्यस्तरीय “सुभेदार वीर तानाजी मालुसरे सन्मान पुरस्कार २०२५” ने सन्मानित
पोलादपूर तालुक्याचे सुपुत्र, इतिहास अभ्यासक रवींद्र मालुसरे राज्यस्तरीय “सुभेदार वीर तानाजी मालुसरे सन्मान पुरस्कार २०२५” ने सन्मानित
पोलादपूर प्रतिनिधी (प्रकाश कदम)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील रणरागिणींच्या स्मृती जागवणारा आणि स्त्रीशक्तीचा पराक्रम नव्या पिढीपुढे उभा करणारा प्रेरणादायी सोहळा मुंबईत दादर येथील श्री शिवाजी मंदिर नाट्यमंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला. या वार्षिक सोहळ्याचे आयोजन श्री शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनल आणि मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
शेकडो विद्यार्थी, पालक, शिवप्रेमी व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष आणि प्रख्यात इतिहास अभ्यासक रवींद्र मालुसरे यांना “सुभेदार वीर तानाजी मालुसरे सन्मान पुरस्कार २०२५” प्रदान करण्यात आला. मालुसरे यांनी इतिहास संशोधनासोबत समाजप्रबोधनासाठी दिलेले योगदान लक्षात घेऊन हा मानाचा सन्मान त्यांना मिळाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकली. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित इतिहास अभ्यासक व ‘मराठेशाहीची धारातीर्थे’ या ग्रंथाचे लेखक प्रवीण भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी शिक्षणाचा उपयोग केवळ प्रमाणपत्रापुरता न ठेवता जीवनात कर्तबगारी दाखवण्यासाठी करावा, असे सांगितले. तसेच, इतिहासातील जिजाऊ माँसाहेब, येसूबाई, ताराराणी, पुण्यश्लोक अहिल्याबाई यांसारख्या रणरागिणींच्या कार्याचा उल्लेख करून विद्यार्थ्यांना त्यांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.
विशेष पाहुणे म्हणून उपस्थित एनएसजी कमांडो नरेश पवार यांनी आपल्या लष्करी कारकिर्दीतील अनुभव मांडले. पठाणकोट हल्ला, जम्मू-काश्मीरमधील कारवाया, तसेच पुंछ येथील बॉर्डरपार ऑपरेशन यांचा उल्लेख करत त्यांनी सैन्यदलातील स्त्रीशक्तीची धैर्यगाथा सांगितली. नुकतेच यशस्वी झालेल्या “सिंदूर ऑपरेशन” मध्ये कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांसारख्या धाडसी महिलांनी कर्तृत्व गाजवले, हे त्यांनी विशेष अधोरेखित केले.
रवींद्र मालुसरे यांचा गौरव
पुरस्कार स्वीकारताना रवींद्र मालुसरे यांनी आपल्या भावनांना उजाळा देताना सांगितले की, “स्वराज्य हे शहाजी राजे आणि जिजाऊ माँसाहेब यांचे स्वप्न होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी ते सत्यात उतरवले आणि असंख्य मावळ्यांनी प्राणांची आहुती देऊन स्वराज्य घडवले. मालुसरे कुळात जन्म झाल्याने सुभेदारांचा इतिहास पुढे नेणे हे माझे कर्तव्य आहे.”
कार्यक्रमादरम्यान संस्थेचे प्रमुख डॉ. हेमंतराजे गायकवाड यांनी संस्थेचे सामाजिक कार्य अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या स्वावलंबनासाठी सुरू केलेल्या डॉ. गायकवाड इन्स्टिट्यूट तसेच श्री शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनल या उपक्रमांचा परिचय करून दिला. “शिवचरित्र विविध भाषांमध्ये पोहोचवण्याचे माझे ध्येय आहे,” असे ते म्हणाले.
या सोहळ्याच्या निमित्ताने शिवकालीन रणरागिणी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. .
Comments
Post a Comment