हरिद्वार-ऋषिकेश यात्रेत वैष्णवांचा उत्साही मेळावा; गंगा आरतीचा अविस्मरणीय अनुभव
हरिद्वार-ऋषिकेश यात्रेत वैष्णवांचा उत्साही मेळावा; गंगा आरतीचा अविस्मरणीय अनुभव
पोलादपूर (प्रकाश कदम):
ईश्वरप्राप्तीचा मार्ग म्हणजेच यात्रा असे महंत व संत सांगतात, त्याचा खरा अनुभव हरिद्वार-ऋषिकेश येथे नुकत्याच संपन्न झालेल्या यात्रेत भाविकांना मिळाला. डॉ. प्रशांत महाराज पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या यात्रेत शेकडो वैष्णव भाविक सहभागी झाले होते. संपूर्ण वातावरण हरिनामाने रंगून गेले होते.
ललितांभा निकेतन आश्रम येथे झालेल्या भजन-कीर्तन कार्यक्रमात टाळ-मृदुंगाच्या गजरात सर्व भाविक मंत्रमुग्ध झाले. विशेष म्हणजे भाषेच्या भिंती नष्ट होऊन विविध प्रांतातील भाविक हरिभजनात एकरूप झाले. या कार्यक्रमाची सांगता डॉ. प्रशांत महाराज पानसरे यांनी काल्याचे कीर्तन करून केली.
यात्रेच्या प्रारंभी दिल्लीतील अक्षरधाम मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर, ऐतिहासिक लाल किल्ला आणि कमळ मंदिराचे दर्शन घेण्यात आले. त्यानंतर भाविकांनी देवभूमी हरिद्वारमध्ये प्रवेश करून ‘हर की पौरी’ घाटावरील गंगा आरतीचा दिव्य अनुभव घेतला. हजारो दिव्यांनी उजळलेला घाट आणि चमकणाऱ्या गंगेत त्यांचे प्रतिबिंब हा सर्वांच्या मनावर कोरला जाणारा क्षण ठरला.
हरिद्वारमधील दक्ष महादेव मंदिर, बिलकेश्वर महादेव मंदिर, गौरी कुंड, सती कुंड, मनसा देवी मंदिर, माया देवी मंदिर आणि नील पर्वत मंदिर या पवित्र स्थळांचे दर्शन घेण्यात आले. टेकडीवर वसलेले मनसा देवी मंदिर भक्तीभावाने भाविकांनी गाठले.
यानंतर ऋषिकेशमध्ये नीलकंठ महादेव मंदिर, परमार्थ निकेतन आणि गीता भवन यांचे दर्शन घेण्यात आले. ही स्थळे गंगेच्या सान्निध्यात असून, अध्यात्म, शांतता आणि सुंदर वास्तुकलेमुळे भाविकांच्या मनाला स्पर्शून गेली. त्यानंतर रामझुला व जानकी झुल्याचे दर्शन घेऊन यात्रेचा समारोप झाला.
ही यात्रा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी माजी सभापती सीताराम कदम, माजी पोलिस निरीक्षक रेणोसें साहेब, विकास रोडे, सुगंधा ताई सुतार, चाळके काका, शेखर शेटे, महाडिक, सरपंच गणेश भोसले व इतर सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
भाविकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवणारी ही हरिद्वार-ऋषिकेश यात्रा श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्म यांचा संगम ठरली.
Comments
Post a Comment