आंबेनळी घाटातील आंब्याची झाडं नामशेष होण्याच्या मार्गावर – पुनर्लागवडीची मागणी जोरात

आंबेनळी घाटातील आंब्याची झाडं नामशेष होण्याच्या मार्गावर – पुनर्लागवडीची मागणी जोरात

जितेंद्र करंडे

 प्रतापगड प्रतिनिधी :
सह्याद्रीच्या डोंगररांगा, हिरवाई आणि जैवविविधतेने नटलेला आंबेनळी घाट हे कोकण व देशाला जोडणारे एक महत्त्वाचे प्रवेशद्वार आहे. परंतु या घाटाचे वैशिष्ट्य मानली जाणारी आंब्याची झाडे आता हळूहळू नामशेष होताना दिसत आहेत.

ब्रिटिश काळातील अधिकारी फिटस गेरल्ड यांनी महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यान सुमारे 45 किलोमीटर लांबीचा घाटरस्ता उभारला. वळणावळणावर आंब्याची दाट झाडे पाहायला मिळत असल्याने या घाटाला पुढे आंबेनळी घाट असे नाव मिळाले. या झाडांच्या सावलीतून प्रवास करण्याचा अनुभव घाटात फिरणाऱ्या प्रवाशांसाठी एक वेगळीच ओढ निर्माण करणारा होता.

मात्र, गेल्या काही दशकांत परिस्थितीत मोठे बदल झाले. दरडी कोसळणे, रस्त्याच्या रुंदीकरणाची कामे, नैसर्गिक आपत्ती आणि सततच्या मानवी हस्तक्षेपामुळे आंब्याची झाडे एकेक करून नाहीशी होऊ लागली. आज परिस्थिती अशी आहे की घाटाच्या वळणावळणावर मोजकीच झाडे उरली आहेत.

सध्या महाराष्ट्र राज्य रस्ता विकास महामंडळाकडून घाटाच्या रुंदीकरणाची मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. या कामांदरम्यान अजूनही काही झाडांची तोड अपरिहार्य ठरत आहे. जैवविविधतेने समृद्ध असलेल्या पश्चिम घाटातील हा मार्ग पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील असल्याने स्थानिक ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

घाटातील आंब्याची झाडे केवळ रस्त्याची शोभा वाढवत नव्हती, तर तेथील वातावरणाला नैसर्गिक समतोल देण्याचे काम करत होती. त्यामुळे "या घाटामध्ये पुन्हा आंब्याची झाडे पाहायला मिळतील का?" हा प्रश्न आता सर्वांसमोर उभा आहे. स्थानिक नागरिक प्रशासनाला विनंती करत आहेत की रुंदीकरणाच्या कामासोबतच आंब्याची मोठ्या प्रमाणावर पुनर्लागवड करण्यात यावी.

याबाबत ग्रामस्थांचा ठाम आग्रह आहे की –

  • घाटाच्या दोन्ही कडेला नव्याने आंब्याची लागवड करावी.
  • झाडांचे संगोपन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी.
  • पर्यावरणपूरक विकासास प्राधान्य द्यावे.

आंबेनळी घाट हा कोकण-देश यांना जोडणारा प्राचीन व ऐतिहासिक मार्ग असून, त्याची ओळख टिकवण्यासाठी आंब्याच्या झाडांची पुनर्लागवड ही काळाची गरज आहे, असे स्थानिकांनी स्पष्ट केले आहे.

घाटाची गाथा सांगणारी आंब्याची झाडे पुन्हा फुलतील का? हे प्रशासनाच्या पर्यावरणपूरक दृष्टिकोनावर अवलंबून राहिले आहे.


Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl