रितेश देशमुख महाबळेश्वर भेटीवर – "राजा शिवछत्रपती" चित्रपटासाठी लोकेशन पाहणी
महाबळेश्वर प्रतिनिधी ( विलास काळे ) दि. १५ :
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता रितेश देशमुख यांनी आपल्या आगामी ऐतिहासिक चित्रपट "राजा शिवछत्रपती" च्या शूटिंगसाठी लोकेशन पाहणी करण्यासाठी महाबळेश्वर येथे भेट दिली.
या दौऱ्यात रितेश देशमुख यांनी कृष्णामाई मंदिर परिसराला भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. स्थानिक नागरिकांच्या वतीने त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊंना केलेल्या सुवर्ण तुला प्रसंगाचे चित्र भेट स्वरूपात देण्यात आले. ही ऐतिहासिक भेट स्वीकारताना रितेश देशमुख भावूक झाले आणि छत्रपतींचा वारसा आपल्या कलाकृतीतून प्रभावीपणे उभा करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
यानंतर त्यांनी क्षेत्र महाबळेश्वर व परिसरातील विविध ऐतिहासिक व निसर्गरम्य ठिकाणांची पाहणी केली. "राजा शिवछत्रपती" या चित्रपटाच्या भव्यतेसाठी या स्थळांचा उपयोग व्हावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर लवकरच येथे शूटिंग सुरू करण्याचा मानस त्यांनी स्पष्ट केला.
या भेटीच्या प्रसंगी क्षेत्र महाबळेश्वरमधील युवा कार्यकर्ते प्रदीप कात्रट, सरपंच सुनील बिरामणे, महाबळेश्वर अर्बन बँकेचे संचालक प्रशांत कात्रट, तसेच इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
गावकऱ्यांनी रितेश देशमुख यांच्या या उपक्रमाचे स्वागत करत, महाबळेश्वरचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा चित्रपटाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर पोहोचावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
Comments
Post a Comment