कुंभरोशी व महाबळेश्वर तालुक्यातील विकासकामांमध्ये निकृष्ट दर्जा – नागरिक त्रस्त, कंत्राटदारांवर कारवाईची मागणी
कुंभरोशी व महाबळेश्वर तालुक्यातील विकासकामांमध्ये निकृष्ट दर्जा – नागरिक त्रस्त, कंत्राटदारांवर कारवाईची मागणी
महाबळेश्वर प्रतिनिधी (जितेंद्र कारंडे):
महाबळेश्वर तालुक्यातील गावोगावी गेल्या काही वर्षांत प्रशासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्यात आली. मात्र या कामांचा दर्जा अतिशय हलगर्जीपणे केला गेला असून, गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. विशेषतः मौजे कुंभरोशी या गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, समाजमंदिर, अंतर्गत रस्ते, जलपुरवठा योजना अशा अनेक महत्त्वाच्या कामांत कंत्राटदारांच्या मनमानीचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.
कुंभरोशी गाव प्रतापगडाच्या पायथ्याशी वसलेले असून तालुक्याच्या पश्चिम भागातील प्रमुख गाव मानले जाते. मागील चार वर्षांत येथे झालेले विकासकाम नागरिकांसाठी वरदान ठरावे, अशी अपेक्षा होती. परंतु वास्तवात ही कामे सुरुवातीपासूनच निकृष्ट दर्जामुळे गावकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.
🔹 निकृष्ट दर्जाची उदाहरणे
- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इमारत आधीच गळकी होऊन विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
- अंगणवाडी इमारतीचे बांधकाम अपूर्ण सोडले असून, ग्रामस्थांच्या सूचनांकडे कंत्राटदारांनी दुर्लक्ष केले आहे.
- समाजमंदिरांच्या भिंतींना भेगा पडल्या आहेत.
- जलपुरवठा योजनेतील पाईप उघड्यावर पडलेले असून टाकीचे कामही अपूर्ण आहे.
हीच परिस्थिती महाबळेश्वर तालुक्यातील इतर भागांतही दिसून येत आहे. कासवड ते हातलोट पूल, पारसोंड येथील पूल, वाहून जाणारे रस्ते, जल जीवन मिशनची अपूर्ण कामे यांमुळे स्थानिक लोकांना प्रचंड गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.
🔹 प्रशासनाची निष्क्रियता – नागरिकांची नाराजी
या सर्व गोष्टी प्रशासनाच्या निदर्शनास वेळोवेळी आणून दिल्यानंतरही काही अधिकाऱ्यांनी ‘धृतराष्ट्र’ाची भूमिका घेतल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रशासनातील काही अधिकारी आपले वैयक्तिक हितसंबंध जपण्यासाठी कंत्राटदारांना पाठीशी घालत असल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
🔹 सनी मोरे यांची स्पष्टोक्ती
औद्योगिक प्रशिक्षण संस्था सल्लागार समिती सदस्य सनी मोरे यांनी या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “गावातील शाळा इमारत व अंगणवाडी ही पवित्र कामे असून त्यामध्ये भ्रष्टाचार व निकृष्ट दर्जा खपवून घेतला जाणार नाही. नागरिक त्रस्त झाले आहेत. पुढे असे प्रकार चालू राहिल्यास आम्ही संविधानिक मार्गाने लढा उभारू,” असा इशारा त्यांनी दिला.
तसेच, निकृष्ट काम करणाऱ्या बांधकाम कंत्राटदारांच्या परवान्यांना काळ्या यादीत टाकून त्यांना कोणतेही सरकारी काम देऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली.
👉 या गंभीर प्रकरणामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून, विकासकामांच्या नावाखाली होणाऱ्या भ्रष्टाचाराविरोधात तातडीने कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी सातत्याने होत आहे.
Jeetu dada nice work
ReplyDeleteधन्यवाद 🙏
ReplyDelete