वैकुंठवासी हनुमंत दळवी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दीपस्तंभ उभारणी; ग्रामस्थांचा विकास कार्यकर्त्याला अभिवादन
वैकुंठवासी हनुमंत दळवी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दीपस्तंभ उभारणी; ग्रामस्थांचा विकास कार्यकर्त्याला अभिवादन
प्रकाश कदम
पोलादपूर प्रतिनिधी :
पोलादपूर तालुक्यातील दाभिळ सुपुत्र व ग्रामविकासासाठी नेहमीच झटणारे वैकुंठवासी हनुमंत धोंडू दळवी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ग्रामस्थांनी एक आगळावेगळा उपक्रम राबवला. त्यांच्या उत्तरकार्याच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर कायमस्वरूपी स्मृती दीपस्तंभ उभारण्यात आला असून, त्यांच्या कार्याची आठवण भावी पिढ्यांसाठी जपली जाणार आहे.
गावविकासासाठी तत्पर व्यक्तिमत्त्व
वै.हनुमंत दळवी हे गावातील कुठल्याही विकासकामासाठी नेहमीच पुढाकार घेत असत. पाणी योजना असो, रस्त्यांची उभारणी असो, अथवा धार्मिक-सामाजिक कार्यक्रम जसे पारायण, प्रत्येक क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग होता. गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी दिलेले योगदान ग्रामस्थ विसरणे अशक्य असल्याने त्यांच्या स्मरणार्थ दीपस्तंभ उभारण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.
दीपस्तंभाचे उद्घाटन आणि भावनिक वातावरण
सदर दीपस्तंभाचे उद्घाटन गुरुवर्य रघुनाथ महाराज मोरे व गुरुवर्य केशव महाराज दळवी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र भूषण गायनाचार्य हरिभाऊ रिंगे यांच्यासह या पंचक्रोशीतील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हनुमंत दळवी यांच्या उत्तरकार्याला प्रचंड जनसमुदाय दाभिळ येथे जमला होता. वातावरणात त्यांच्या आठवणींनी आणि योगदानाने भारावलेपणा होता.
"त्यांचे कार्यच दीपस्तंभ" – चंद्रकांत कळंबे
या कार्यक्रमाला उपस्थित राहून रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी हनुमंत दळवी यांच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले –
“वैकुंठवासी हनुमंत दळवी यांचे कार्य दीपस्तंभासारखेच आहे. जसा दीप अंधार दूर करून प्रकाश पसरवतो, तसाच त्यांचा जीवनप्रवास गावातील तरुणांना नेहमीच प्रेरणा देईल. त्यांच्या स्मृती दीपस्तंभामुळे नव्या पिढीला त्यांच्या कार्याची जाणीव राहील.”
ग्रामस्थांचा श्रद्धांजली स्वरूपातील संदेश
गावकऱ्यांनी व्यक्त केले की, हनुमंत दळवी यांचे कार्य गावासाठी दीपस्तंभ ठरेल. त्यांच्या स्मृतीतून उभारलेला हा दीपस्तंभ गावाच्या प्रत्येक कोपऱ्यातील लोकांना एकत्र आणणारा आणि प्रेरणा देणारा ठरेल.
Comments
Post a Comment