मोरया मोरया च्या गजरात पोलादपूर तालुक्यात गौरी-गणपतींचे विसर्जन : भक्तीमय जल्लोषात निरोप
पोलादपूर प्रतिनिधी (प्रकाश कदम)
संपूर्ण तालुका "मोरया मोरया" च्या गजरात आणि "पुढच्या वर्षी लवकर या" या आरोळ्यांनी दुमदुमला, जेव्हा सात दिवसांच्या गौरी-गणपतींना पारंपरिक जल्लोषात निरोप देण्यात आला. २ सप्टेंबर रोजी दुपारी ३ नंतर कामथी, ढवळी, चोळई आणि सावित्री नदीपात्रात एकाच वेळी विसर्जनाची सुरुवात झाली. यंदा पोलादपूर तालुक्यात तब्बल ५३० गौरी आणि १३०५ गणपतींचे पारंपरिक रीतिरिवाजाने विसर्जन करण्यात आले.
भक्तिमय आणि उत्साही वातावरण
गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे वातावरण ओलंसर झालं होतं. मात्र विसर्जनाच्या दिवशी सकाळपासूनच सूर्यदर्शन झाल्याने भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण होते. अधूनमधून झालेल्या सरींमध्ये भिजतच गणेशभक्तांनी भक्ति आणि उत्साहाचा संगम अनुभवला.
घराघरात आरत्या, कीर्तन, जागरण, नाच-फुगडीमुळे सात दिवस भक्तिमय झाले होते. अनेकांनी फुलांची आरास, रंगमंदिर सजावट तर काहींनी आगळेवेगळे देखावे उभारून बाप्पांची सेवा केली.
गावागावांतून उत्साहपूर्ण विसर्जन
पोलादपूर शहरासह वाकण, कामथे, देवळे, आडावळे, कुडपण, कोतवाल, देवपूर, तुर्भे खोडा, बोरघर, धारवली, हावरे, पळचिल, ओंबळी, कापडे अशा गावागावांतील घरगुती गौरी-गणपतींचे विसर्जन शासनाने आखून दिलेल्या नियमावलीनुसार करण्यात आले. विसर्जनस्थळी पोहोचण्यासाठी खालुबाजा, लेझीम, टाळ-मृदंग आणि डीजेच्या तालावर नाचत मंडळी मार्गक्रमण करत होती. महिलावर्गांनी गौरींना हातात घेऊन विसर्जनासाठी नेले, तर गणेशभक्त काहींनी बाप्पांना खांद्यावर तर काहींनी वाहनातून नेऊन निरोप दिला.
सार्वजनिक गणपतींचे विसर्जन
तालुक्यातील चार प्रमुख सार्वजनिक गणपतींचे विसर्जनही ढवळी, कामथी, सावित्री व चोळई नदीपात्रात पार पडले. दुपारी ४ नंतर झालेल्या या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांच्या निनादासह युवकांनी जल्लोष केला. "मोरया मोरया" चा गजर संपूर्ण नदीपात्रात घुमला.
पोलिस आणि स्वयंसेवी संस्थांचा बंदोबस्त
विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. ३१ पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि १२ होमगार्ड्स तैनात होते. पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, उपनिरीक्षक मंगेश मुंडे, पीएसआय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड्स यांनी काम पाहिले. तसेच काही सेवाभावी संस्थांनीही विसर्जन स्थळी कार्यरत राहून मदत केली.
भक्तांचा भावनिक निरोप
गौरी-गणपतींच्या निरोपावेळी अनेकांच्या डोळ्यांत पाणी तर चेहऱ्यावर हसू होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी उत्साह, भक्ती आणि श्रद्धेने "पुढच्या वर्षी लवकर या" अशी प्रार्थना केली.
संपूर्ण तालुका भक्तिमय झाला होता. पारंपरिक गावरान खालुबाजा, लेझीमच्या तालावर, फुगडी नाच, आरत्या आणि टाळ-मृदंगाच्या स्वरांत गौरी-गणपतींना निरोप देत पोलादपूर तालुक्याने आपल्या सांस्कृतिक परंपरेला उजाळा दिला.
गणपती बाप्पा मोरया
ReplyDelete