दानवली शिवारात बिबट्याचा कहर – बकरी ठार, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
भिलार प्रतिनिधी
दानवली (ता. महाबळेश्वर) – महाबळेश्वर तालुक्यातील दानवली गावातील खालची माची शिवारात आज (सोमवार) दुपारी साधारण दोनच्या सुमारास बिबट्याने एका पाळीव बकरीवर हल्ला करून तिला ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये मोठी घबराट पसरली आहे.
विश्वनाथ तुकाराम दानवले यांच्या मालकीची बकरी दुपारच्या सुमारास शिवारात चरत असताना अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. क्षणात तिला आपल्या तावडीत ओढून नेऊन बिबट्याने ठार केले. ही घटना प्रत्यक्षदर्शींनी पाहताच गावभर बातमी पसरली आणि नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी धावून गेले.
गेल्या काही दिवसांपासून दानवली परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. शेतांमध्ये, पायवाटांवर आणि शिवारात बिबट्याच्या हालचाली सतत दिसून येत असल्याने शेतकरी व ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. त्यामुळे रात्री उशिरा शेतात जाणे किंवा एकट्याने फिरणे अवघड झाले आहे.
या घटनेमुळे केवळ पाळीव जनावरांची सुरक्षा धोक्यात आली नसून ग्रामस्थांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. "गावातच बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. वन विभागाने त्वरित या बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावून कारवाई करावी. अन्यथा मोठा अनर्थ ओढवू शकतो," अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेऊन तातडीने घटनास्थळाची पाहणी करावी, पिंजरे लावून बिबट्याला पकडण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी एकमुखाने ग्रामस्थांची मागणी आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी गावात नियमित गस्त आणि जनजागृती मोहीम राबवावी, अशीही मागणी होत आहे.
या घटनेमुळे दानवली व परिसरातील गावांमध्ये मोठी दहशत पसरली असून ग्रामस्थ वन विभागाकडून तातडीच्या कारवाईची अपेक्षा करत आहेत.
Comments
Post a Comment