पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचा कोंढवली गावाचा आदर्श, लिंब गावात कृत्रिम कुंडात विसर्जनाची तयारी
सातारा प्रतिनिधी :
राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने यंदा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला जिल्ह्यातील विविध गावांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, सातारा तालुक्यातील कोंढवली गावाने पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची अंमलबजावणी करून इतर गावांसाठी आदर्श निर्माण केला आहे.
परंपरेनुसार कोंढवली गावातील घरगुती गणेशमुर्ती लिंब गावच्या नदीपात्रात विसर्जित केल्या जात असत. मात्र यातील अनेक मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी) च्या असल्याने नदी प्रदूषणाचा मोठा प्रश्न निर्माण होत होता. यंदा हा धोका ओळखून कोंढवली ग्रामस्थांनी पर्यावरण संवर्धनासाठी सकारात्मक निर्णय घेतला. गणेशमूर्तींची विधिवत पूजा करून त्या थेट लिंब ग्रामपंचायत प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या.
या उपक्रमाला गती देण्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी कोंढवली गावाला भेट देऊन ग्रामस्थांमध्ये पर्यावरणपूरक विसर्जनाविषयी प्रबोधन केले. त्यांच्या आवाहनाला ग्रामस्थांनी उत्साहाने प्रतिसाद दिला. परिणामी गावातील सर्व गणेशमुर्ती सुरक्षितपणे ग्रामपंचायत प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या.
दरम्यान, लिंब गावातील सार्वजनिक गणेश मंडळांचे विसर्जन येत्या शनिवारी होणार असून, त्यासाठी विशेष नियोजन सुरू आहे. गावातील गणेशमूर्तींचे विसर्जन नदीत न करता कृत्रिम कुंडामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत लिंब ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली. बैठकीत ग्रामपंचायतीचे प्रशासक व विस्तार अधिकारी श्री. जाधव, ग्रामविकास अधिकारी श्री. चव्हाण, जिल्हा माहिती कार्यालयाचे वैभव जाधव तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
बैठकीत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विसर्जन सोहळ्यासाठी ग्रामपंचायत कृत्रिम कुंडाची उभारणी करणार असून, नागरिकांना याबाबत मार्गदर्शन केले जाईल.
कोंढवली गावाने दाखविलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे जिल्हाभर कौतुक होत असून, यामुळे अन्य गावांनाही प्रदूषणमुक्त विसर्जनासाठी प्रेरणा मिळणार आहे.
Comments
Post a Comment