पोलादपूरात सततधार पाऊस, सावित्री नदीला पूर!नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; शाळा–महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
पोलादपूर/प्रतिनिधी – प्रकाश कदम
पोलादपूर तालुक्यात मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले असून गेल्या २४ तासांत तब्बल १६१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत तालुक्यातील पावसाची सरासरी ३२४१ मि.मी. इतकी झाली असून त्यामुळे रायगड जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
महाबळेश्वर घाटमाथ्यावर सुरू असलेल्या प्रचंड पावसाचा परिणाम सावित्री नदीवर दिसून येत असून नदी दुथडी भरून वाहत आहे. सावित्रीसह कामथी, घोडवली आणि चोळई या नद्याही धोक्याच्या पातळीवर असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी पाणी गावाकडे येण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी ठेवावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रशासन अलर्ट मोडवर
तालुका दुर्गम आणि डोंगराळ असल्याने दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार कपिल घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, गटविकास अधिकारी दीप्ती गाट यांनी गावपातळीवरील पोलीस पाटील आणि स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधून समन्वय साधला आहे. आपत्ती व्यवस्थापन पथक, महसूल कर्मचारी, पोलीस दल, तसेच श्री काळभैरवनाथ रेस्क्यू टीम या ठिकाणी सज्ज असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
हवामान विभागाचा रेड अलर्ट
भारतीय हवामान खात्याने रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून पुढील काही तासांतही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. नागरिकांनी शक्यतो घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता लक्षात घेता आवश्यकतेनुसार स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
अफवांपासून सावध
आपत्ती निवारण विभाग आणि पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अतिवृष्टीदरम्यान कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. फक्त शासन आणि प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.
दरम्यान, पोलादपूर तालुक्यात आज सकाळपासूनच पावसाने पुन्हा जोर धरला असून अनेक भागांत रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तरीही प्रशासनाच्या तातडीच्या उपाययोजना आणि बचाव पथकांच्या सतर्कतेमुळे आतापर्यंत मोठी जीवितहानी टळली आहे.
➡️ एकंदरीत, पोलादपूर तालुका सध्या अतिवृष्टीच्या झळा सहन करत असला तरी प्रशासन, पोलीस, स्थानिक स्वयंसेवी संघटना यांनी एकत्रितपणे आपत्ती व्यवस्थापनाचे काम हाती घेतले असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Comments
Post a Comment