प्रतापगडावर मावळा प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यावतीने स्वच्छता व संवर्धन अभियान
प्रतापगड वार्ताहर – अमित जाधव
शिवरायांचा इतिहास जागवणाऱ्या किल्ले प्रतापगडावर मावळा प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने आयोजित स्वच्छता व संवर्धन अभियान हजारो मावळ्यांच्या उपस्थितीत उत्साहात आणि यशस्वीरित्या संपन्न झाले.
या उपक्रमाचे सूत्रधार मावळा प्रतिष्ठानचे संस्थापक तथा नगरचे खासदार लोकनेते निलेश लंके होते. त्यांच्या संकल्पनेतून आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे तसेच ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेला ऐतिहासिक स्वरूप लाभले.
खासदारांचा कार्यकर्त्यांत मिसळून सहभाग
कार्यक्रमादरम्यान खासदार निलेश लंके यांनी फक्त नेतृत्वच केले नाही तर ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांप्रमाणे प्रत्येक कामात प्रत्यक्ष सहभागी झाले. साहित्य उतरवणे, ते गडावर नेणे, अशा प्रत्येक टप्प्यात त्यांनी स्वतः कष्ट घेत मावळ्यांना प्रेरणा दिली. त्यांच्या या साधेपणामुळे आणि हिरीरीमुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश निर्माण झाला.
भवानी मातेस आरती आणि महाराजांना मानवंदना
गडावरील भवानी माता मंदिरात पूजन व आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ नेत्यांनी अभिवादन करून त्यांना मानवंदना अर्पण केली. यावेळी कला पथकाने अफजलखानवधाचा देखावा सादर केला, ज्याला उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली. परिसर जय शिवाजी, जय भवानी या घोषणांनी दुमदुमून गेला.
स्वच्छता मोहिमेत ग्रामपंचायतचाही सहभाग
स्थानिक ग्रामपंचायत सरपंच कांचन सावंत यांनीही खुरपे हातात घेऊन स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला. त्यांच्यासह युवक, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी गड संवर्धनासाठी श्रमदान केले.
संवाद आणि विकास आराखडा
कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना शशिकांत शिंदे व जयंत पाटील यांनी गड संवर्धन मोहिमेचे महत्त्व अधोरेखित केले. त्याचबरोबर गडावरील विकासकामांच्या संदर्भात स्थानिक नागरिकांशी संवाद साधत विकास आराखड्याची माहिती दिली. राजकीय प्रश्नांनाही त्यांनी ठामपणे उत्तरे दिली.
कार्यकर्त्यांची शपथ
कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी राजमाता जिजाऊंना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर हजारो कार्यकर्त्यांनी गड संवर्धनाची शपथ घेतली.
मान्यवरांची उपस्थिती
या उपक्रमासाठी महाबळेश्वर तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे . नितीन सावंत, तालुका अध्यक्ष डॉ सुभाष कारंडे, ज्येष्ठ नेते विश्वनाथ सपकाळ, तालुका सरचिटणीस सुनील सकपाळ, सातारा जिल्हा उपाध्यक्ष आशिष चोरगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष अमित जाधव, महाबळेश्वर शहर अध्यक्ष शंकर पवार आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व मावळे उपस्थित होते.
या स्वच्छता व संवर्धन मोहिमेतून प्रतापगडाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव जपण्याचा संकल्प प्रत्यक्षात उतरताना पाहायला मिळाला. हा उपक्रम भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
Comments
Post a Comment