पर्यावरणपूरक घरगुती गौरी-गणपती उत्सव स्पर्धा २०२५ : श्रीक्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायतीकडून उपक्रम
श्रीक्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायत व ‘हिल्दारी’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक घरगुती गौरी गणपती उत्सव स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा घराघरांत होत असलेल्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरकता, पारंपरिक संस्कृती व सामाजिक जबाबदारी यांचा सुंदर संगम घडविण्याचा प्रयत्न या स्पर्धेतून केला जाणार आहे.
या संदर्भात माहिती देताना ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील बिरामणे म्हणाले,
“गणेशोत्सव हा आपला लोकसण असून त्याला घराघरांतही मोठा उत्साह लाभतो. मातृशक्ती व तरुणाई या सणात नवनवीन कल्पकता दाखवतात. त्यांना व्यासपीठ मिळावे तसेच प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली आहे.”
स्पर्धेचे नियम व अटी पुढीलप्रमाणे :
- घरगुती गौरी-गणपती मूर्ती पर्यावरणपूरक व प्राणप्रतिष्ठित असावी (धातू, संगमरवर, फायबर, लाकूड व मातीची मूर्ती) – २० गुण
- पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करणे (दोलोत्सव, लेझीम, भजन-कीर्तन आदी) – २० गुण
- प्रदूषणमुक्त व स्वच्छता राखून पर्यावरणपूरक उपक्रम राबविणे (फटाके-मुक्त, कचरा व्यवस्थापन आदी) – २० गुण
- निर्माल्याची योग्य विल्हेवाट (निर्माल्य पुनर्वापर, व्यवस्थापन पद्धती आदी) – २० गुण
- मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात किंवा पर्यावरणपूरक पद्धतीने करणे – २० गुण
सरपंच सुनील बिरामणे यांनी पुढे सांगितले की,
“यंदा स्पर्धेत विशेषतः ‘हरित व शाश्वत गणेशोत्सव’ या संकल्पनेला प्राधान्य दिले आहे. ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा आणि समाजात आदर्श निर्माण करावा, अशी आमची अपेक्षा आहे.”
स्पर्धेसाठी नावनोंदणीची अंतिम तारीख २६ ऑगस्ट २०२५ निश्चित करण्यात आली असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
आयोजक मंडळाकडून सर्व ग्रामस्थांना आवाहन करण्यात आले आहे की,
“स्पर्धेत सहभागी व्हा, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा आणि पुढील पिढ्यांसाठी हरित संस्कार जोपासा.”
Comments
Post a Comment