महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पावसाचे थैमान; रस्ते जलमय, जनजीवन विस्कळीत
महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पावसाचे थैमान; रस्ते जलमय, जनजीवन विस्कळीत
महाबळेश्वर, ता. 19 ऑगस्ट –
महाबळेश्वर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यात अक्षरशः थैमान घातले आहे. सतत कोसळणाऱ्या धारधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले असून, अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
महाबळेश्वर-पाचगणी मार्गासह तालुक्यातील आंतरगाव रस्त्यांवर पाण्याचा प्रचंड प्रवाह आल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहनांचे तांडे थांबले असून, अपघाताचा धोका वाढला आहे. घाटमाथ्यावर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर घसरडेपणा निर्माण झाला असून, प्रशासनाने वाहनचालकांना काळजीपूर्वक प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.
तालुक्यातील धरण क्षेत्र, नाले आणि ओढ्यांचा पाणीपातळी झपाट्याने वाढत असून, किनारी गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ असली तरी, मुसळधार पावसामुळे धबधबे धोकादायक पातळीवर वाहत आहेत. त्यामुळे प्रशासनाने पर्यटकांना सुरक्षिततेचे भान ठेवून अनावश्यक धाडस टाळण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, पावसामुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले असून, काही ठिकाणी भातासह भाजीपाला पिके पाण्याखाली गेल्याची माहिती मिळत आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नागरिक, शेतकरी व प्रशासन यांची चिंता अधिकच वाढली आहे.
Comments
Post a Comment