महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये गणरायाचे जल्लोषात आगमन
पावसाळ्यातील ओलसर वातावरणात भक्तिभावाने उत्सव साजरा
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात गणेश चतुर्थीचा उत्सव यंदा पारंपरिक उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे. सतत सुरू असलेल्या पावसाच्या सरी, दाट धुके आणि ओलसर हवामान असूनही गावोगावी बाप्पाच्या स्वागतासाठी अनोखा जल्लोष दिसून येत आहे.
ग्रामीण भागातील मंडळे तसेच घरगुती मंडपात पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली. पावसाचा जोर असूनही गणरायाच्या स्वागतासाठी महिलांचा, युवकांचा आणि लहान मुलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
चाकरमानी मंडळी मोठ्या उत्साहाने गावी परतली असून आपल्या कुटुंबियांसह गणेशोत्सव साजरा करण्यासाठी त्यांनी ग्रामीण भाग गजबजून टाकला आहे. पारंपरिक परंपरा, नातलगांची भेटीगाठी आणि एकत्रित पूजनाचा सोहळा यामुळे गावागावात उत्सवी वातावरण अधिकच रंगतदार झाले आहे.
दरम्यान, ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी स्थानिक मंडळांनी सामाजिक संदेश देणारे देखावे साकारले आहेत. पावसाळ्यातील ओलसर हवामानामुळे काही ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी गावकऱ्यांचा उत्साह मात्र अबाधित आहे.
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सर्वत्र आरोग्य, समृद्धी आणि ऐक्याचा संदेश देत भक्तिमय वातावरणात “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषाने तालुका दुमदुमून गेला आहे.
Comments
Post a Comment