भर पावसात मावळा प्रतिष्ठानचे हजारो मावळे प्रतापगड स्वच्छता संवर्धन कार्यात सहभागी
निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली उपक्रमाची सुरूवात; प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे व जयंत पाटील यांची उपस्थिती
प्रतापगड/वार्ताहर –
इतिहासप्रसिद्ध प्रतापगड किल्ला हा केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि स्वराज्य स्थापनेची साक्ष देणाऱ्या या गडावर स्वच्छता व संवर्धन कार्याची तातडीची गरज ओळखून मावळा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेने मोठा उपक्रम हाती घेतला आहे.
भर पावसातही हजारो मावळ्यांनी गड संवर्धनासाठी हजेरी लावून गडाचा परिसर स्वच्छ करण्याचे कार्य हाती घेतले. या उपक्रमाचे नेतृत्व मावळा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निलेश लंके यांनी केले. विशेष म्हणजे या उपक्रमासाठी मावळ्यांचा उत्साह आणि बांधिलकी पाहून परिसरातील ग्रामस्थ आणि पर्यटकांनीही स्तुतिसुमने अर्पण केली.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी गड संवर्धनाच्या कामाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “प्रतापगड हा आपला ऐतिहासिक वारसा असून तो पुढील पिढ्यांसाठी जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. मावळा प्रतिष्ठानचे कार्य हे युवकांना दिशा दाखवणारे आहे.”
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनीही उपस्थित राहून या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, “गड जतन आणि स्वच्छता हे फक्त शासनाचे कर्तव्य नसून लोकचळवळीतून होणारे संवर्धन अधिक प्रभावी ठरते. अशा उपक्रमांतून भविष्यातील समाजमन घडत आहे.”
हजारो स्वयंसेवकांनी दिवसभर चाललेल्या मोहिमेत गडावरील कचरा गोळा करून परिसराची स्वच्छता केली. तसेच प्लास्टिक मुक्त गड उपक्रमावर भर देण्यात आला. काही ठिकाणी झाडांची लागवड करून पर्यावरणपूरक संदेशही देण्यात आला.
या प्रसंगी विविध सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पावसाची तमा न बाळगता मावळ्यांनी केलेल्या या कार्यामुळे “गड जतनासाठी मावळा” हा संदेश ठळकपणे अधोरेखित झाला.
Comments
Post a Comment