ओबीसीतूनच आरक्षण घेणार; उद्यापासून पाणीही बंद – मनोज जरांगे पाटील
मुंबई :
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले की, “ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि उद्यापासून पाणीही बंद करणार.”
पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सरकारवर तीव्र टीका केली. “मंत्रिमंडळ उपसमिती नुसत्या बैठका घेत आहे. आतापर्यंत तोडगा का काढला नाही? काहीही झाले तरी आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही,” असा सवाल जरांगे पाटील यांनी केला.
शांततेत आंदोलनाचे आवाहन
जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, उद्यापासून ते कडक आमरण उपोषण सुरू करणार असून, यावेळी मराठा समाजातील कोणत्याही युवकाने दगडफेक किंवा हिंसक कृती करू नये. “आपल्यावर कितीही अन्याय झाला तरी शांततेचा मार्ग सोडायचा नाही. समाजाला खाली मान घालावी लागेल, असे कुठलेही पाऊल उचलले जाणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
शनिवारी-रविवारी मुंबईत मोठी गर्दी अपेक्षित
आंदोलनाला अधिक वेग देण्यासाठी त्यांनी जाहीर केले की येत्या शनिवारी–रविवारी महाराष्ट्रातील एकही मराठा घरात थांबणार नाही. “मुंबईकडे एवढा जनसागर येईल की, १०० ते २०० किलोमीटरपर्यंत रांगा लागतील. आपण जे बोलतो ते करतो,” असे ते म्हणाले.
“मुख्यमंत्र्यांनी गर्दी न समजता वेदना समजाव्यात”
जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, “ओबीसीतूनच आरक्षण घ्यायला मी खंबीर आहे. मुख्यमंत्री यांनी हे केवळ गर्दी म्हणून न पाहता समाजाच्या वेदना म्हणून समजावे.”
मुंबईकरांच्या मदतीचे कौतुक
ते म्हणाले की, “आमच्या गरीब मराठ्यांना सर्वसामान्य मुंबईकर आणि श्रीमंत मुंबईकर – सगळ्या जातीधर्माचे लोक मदत करत आहेत. त्यामुळे याला गर्दी समजू नये.”
वाहतुकीच्या दृष्टीनेही त्यांनी सूचना दिल्या – “मुंबईत पार्किंगची सुविधा नाही. त्यामुळे गाड्या नवी मुंबई, वाशी, शिवडी, मस्जिद बंदर या परिसरात पार्क करून रेल्वेने आझाद मैदान गाठावे.”
“पैसे मागू नका, दिले असतील तर परत घ्या”
अनुदान आणि देणग्यांच्या गैरवापरावर जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला. “माझ्या नावावर कुणीही पैसे मागू नका. अन्नछत्र सुरू आहे पण त्याच्या नावावरही पैसे घेतले जात आहेत. मी पुराव्यासह नाव घेईन. एक रुपयाही कुणाला देऊ नका. दिले असतील तर परत मागा,” असे त्यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
राजकीय संदर्भात त्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर घणाघात केला. “ठाकरे ब्रँड चांगला आहे, पण राज ठाकरे विनाकारण मराठ्यांच्या प्रश्नांवर बोलतात. १३ आमदार निवडून दिले ते पळून गेले. लोकसभेला फडणवीसांनी तुमचा गेम केला, विधानसभेला तुमचं पोरगं पाडलं, तरीही तुम्ही त्यांचीच बाजू घेतली. राज ठाकरे हे मानाला भुकेलेले आहेत. आमच्या खेड्यात अशा माणसाला ‘कुचक्या कानाचे’ म्हणतात,” असा कडवा शब्दप्रयोग जरांगे पाटील यांनी केला.
मनोज जरांगे पाटील यांच्या या घोषणेमुळे मराठा आरक्षण आंदोलनाला नवे ऊर्जितावस्था मिळाली असून, पुढील काही दिवसांत आझाद मैदान आणि मुंबई परिसरात आंदोलनाला अभूतपूर्व जनसमर्थन मिळण्याची शक्यता आहे.
Comments
Post a Comment