मराठा आरक्षणावर मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक; मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा
मुंबई :
आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी (३१ ऑगस्ट) राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जरांगे यांच्या मागण्यांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली.
ही बैठक महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, दादा भुसे, मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह अनेक मंत्री प्रत्यक्ष उपस्थित होते. तर काही मंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले.
बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले,
“महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक आज संपन्न झाली. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. त्यांच्या मागण्यांच्या अंमलबजावणीत कोणतीही त्रुटी राहू नये, तसेच प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी राज्याचे ॲडव्होकेट जनरल यांचे मार्गदर्शन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”
राज्य सरकार आता ॲडव्होकेट जनरल यांच्या सल्ल्यानंतर पुढील भूमिका निश्चित करणार आहे. यामुळे मराठा आरक्षणाबाबतचा तोडगा लवकरच स्पष्ट होईल, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावरील उपोषण सुरूच ठेवले असून, “मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही,” असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला आहे.
Comments
Post a Comment