महाबळेश्वर नगरपरिषदेतर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेतर्फे यंदाही “पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. योगेश पाटील यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात गेल्या वर्षी झाली होती. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर यंदाचे हे दुसरे वर्ष असून, वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक सण साजरा करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेशभक्तांसाठी काही महत्त्वपूर्ण नियम घालण्यात आले आहेत. यात शाडूमातीची किंवा पर्यावरणपूरक मूर्ती बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. सजावटीसाठी थर्माकॉल, प्लास्टिक यांसारख्या प्रदूषणकारक वस्तूंचा वापर पूर्णपणे बंदीस्त असेल. यासोबतच, उत्सव काळात फटाके टाळण्याचे आणि प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नगरपरिषदेकडून कचरा व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात आला आहे. स्पर्धकांनी घरातील ओला, सुका, घरगुती घातक व बायोमेडिकल कचरा या चार प्रकारांत वर्गीकरण करून नगरपालिकेच्या घंटागाडीत जमा करणे अपेक्षित आहे. या नियमांचे पालन करणाऱ्या स्पर्धकांना अतिरिक्त गुण दिले जातील. तसेच, घरगुती पातळीवर ओल्या कचऱ्यापासून खत तयार करणाऱ्या कुटुंबांना विशेष गुण देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
विसर्जनाच्या दिवशी पर्यावरण संरक्षणासाठी नगरपरिषदेकडून ठरविण्यात आलेल्या ठिकाणीच निर्माल्य जमा करणे सक्तीचे असेल. यामुळे नदी-नाले आणि विहिरींमध्ये प्रदूषण होण्यापासून प्रतिबंध होईल.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी २९ ऑगस्ट २०२५ पूर्वी प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या QR कोडच्या माध्यमातून आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.
विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची सोय करण्यात आली आहे. यामध्ये, प्रथम पारितोषिकासाठी ५००० रुपये, ट्रॉफी व प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिकासाठी ३००० रुपये, ट्रॉफी व प्रमाणपत्र तर तृतीय पारितोषिकासाठी १००० रुपये, ट्रॉफी व प्रमाणपत्र असे स्वरूप असेल. तसेच, स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांना सहभाग प्रमाणपत्र देऊन त्यांचा उत्साह वाढविला जाणार आहे.
या उपक्रमामुळे गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरण संवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचत असून, आगामी काळात महाबळेश्वर शहर “हरित व प्रदूषणमुक्त गणेशोत्सव” या संकल्पनेचे आदर्श उदाहरण ठरेल, असा विश्वास नगरपरिषदेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment