महाबळेश्वर नगरपालिका हद्दीतील सफाई कामगारांचे प्रश्न मार्गी लावणार : शिवसेना महिला आघाडीचा निर्धार
महाबळेश्वर/प्रतिनिधी –
गिरीस्थान म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर शहराच्या स्वच्छतेत सातत्याने अग्रस्थान राखण्यात स्थानिक सफाई कामगारांचा मोलाचा वाटा आहे. मात्र या कामगारांचे मूलभूत प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित राहिले आहेत. त्यांच्या समस्या सोडवण्याचा ठाम निर्धार शिवसेना महिला आघाडीने व्यक्त केला असून याबाबत शिष्टमंडळाने नगरपालिका मुख्याधिकारी श्री. पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली.
सफाई कामगारांच्या समस्या गंभीर
महाबळेश्वरात दररोज हजारो पर्यटक दाखल होत असतात. त्यांच्या सोयीसुविधांसह शहराचे निसर्ग सौंदर्य आणि स्वच्छता राखण्याचे मोठे काम या कामगारांच्या खांद्यावर आहे. मात्र या कामगारांना पगारात विलंब, भत्त्यांचा अभाव, आरोग्य विमा योजना न मिळणे, महिलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सुविधा नसणे, तसेच रेनकोट, हॅण्डग्लोजसारखी सुरक्षात्मक साधने उपलब्ध न होणे या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक वर्षांपासून या समस्या कायम असतानाही ठोस तोडगा निघाला नसल्याने कामगारांमध्ये नाराजी आहे.
शिवसेना महिला आघाडीचा ठाम निर्धार
या संदर्भात शिवसेना नेत्या वर्षाताई आरडे, तालुका प्रमुख मेघा चोरगे व महिला पदाधिकारी यांनी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. “महाबळेश्वरचे पर्यटन आणि येथील स्थानिकांचे आरोग्य हे सफाई कामगारांच्या मेहनतीवर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांचे हक्काचे वेतन, सुविधा व सुरक्षितता मिळणे हे प्राधान्याने होणे गरजेचे आहे. या कामगारांच्या प्रश्नांवर तोडगा निघेपर्यंत शिवसेना महिला आघाडी त्यांच्यासोबत ठामपणे उभी राहील,” अशी ग्वाही वर्षाताई आरडे यांनी दिली.
मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन
बैठकीदरम्यान मुख्याधिकारी श्री. पाटील यांनी सफाई कामगारांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या. काही बाबी तातडीने सोडवता येतील, यावर त्वरित कारवाई केली जाईल, असे त्यांनी आश्वासन दिले. तर काही प्रश्नांवर कंत्राटदार व प्रशासन यांच्यात संयुक्त बैठक घेऊन उपाययोजना करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
महिला आघाडीच्या कामगिरीचे कौतुक
शिवसेना महिला आघाडीने गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांच्या आणि महिलांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवून ठोस पावले उचलली आहेत. त्यामुळे शहरात त्यांच्या धाडसी भूमिकेचे कौतुक होत असून नेतेपद आणि नागरिक या दोन्हीकडून त्यांना समर्थन मिळत आहे. कामगार व महिला यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढणारी महिला आघाडी समाजात एक वेगळी छाप पाडत असल्याचे चित्र आहे.
उपस्थित मान्यवर
या भेटीत वर्षाताई आरडे (वाई विधानसभा प्रमुख), मेघा चोरगे (तालुका प्रमुख), मंगल फळणे (उपतालुका प्रमुख, पूर्व), शीतल ओतारी (उपशहर प्रमुख), सुरेखा पंडित, स्वाती पवार (उपतालुका प्रमुख), अर्चना जाधव (संघटक), सौ. बांदल, सौ. वाघदरे व शमिका वाईकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment