पाचगणीमधून मराठा आरक्षणासाठी उस्फूर्त पाठिंबा सरकारकडून दुर्लक्ष – मराठा समाजाचा संताप उफाळला
पाचगणी प्रतिनिधी :
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर २१ ऑगस्टपासून सुरू केलेल्या आंदोलनाला पाचगणी व परिसरातील मराठा समाज बांधवांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातून काढण्यात आलेल्या मराठा जागृती रॅलीत सरकारच्या उदासीन भूमिकेविरोधात संताप व्यक्त करत घोषणाबाजी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी समाजबांधव मोठ्या संख्येने एकत्र जमले. “मराठ्यांना न्याय द्या”, “आरक्षण आमचा हक्क आहे” अशा घोषणा देत रॅली काढण्यात आली. रॅलीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत सरकारला इशारा दिला की – “आता वेळ घालवू नका; आरक्षण द्या, अन्यथा संघर्ष अटळ."
या रॅलीत अजितभाऊ कसुर्डे, अकुश आबा मालुसरे, यशवंत पाटे, संजय कसुर्डे, हरीश शेठ गोळे, शरद कसुर्डे, गजानन भिलारे, राजू आबा भिलारे, नितीन भाई भिलारे, सुनील बिरामणे, सुनील पार्टे, मोरेश्वर कसुर्डे, अरुण कसुर्डे, संदेश कसुर्डे, अमित भिलारे, संजय राजपुरे, जनार्दन कळंबे, आर.डी. मालुसरे, विष्णू अप्पा मालुसरे, सदाशिव मालुसरे, गौरव कसुर्डे, सतीश दुधाणे, मनोहर कसुर्डे यांसह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते
ग्रामीण भागातील बहुसंख्य शेतकरी मराठा समाजातील असून शेतीतील संकटे, जमिनीची विभागणी, शिक्षण व रोजगारातील संधींची कमतरता यामुळे त्यांचे जीवन अधिकच कठीण झाले आहे. हुशार विद्यार्थी अल्प फरकाने शासकीय नोकरीतून वंचित राहत असल्याने आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे.
समाजबांधवांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की – “सरकारकडे मराठा कुणबी नोंदींचे हजारो पुरावे असतानाही आरक्षण नाकारले जात आहे. हा उघड अन्याय असून, मराठा समाज मागास असल्याचे पुरावे असतानाही सरकार जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे.”
रॅलीतून समाजबांधवांनी सरकारला ठाम इशारा दिला –
“आरक्षण हा आमचा हक्क आहे; तो नाकारला तर मराठा समाज गप्प बसणार नाही. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाचगणीसह संपूर्ण महाराष्ट्र उभा राहील. सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही, तर रस्त्यावरची चळवळ पेट घेईल.”
Comments
Post a Comment