गावाच्या प्रगतीचा दीपस्तंभ – प्रदीप कात्रट
(२५ ऑगस्ट वाढदिवसानिमित्त बालमित्र राजेंद्र पुजारी यांच्या आठवणी)
श्री क्षेत्र महाबळेश्वर :
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणारे, प्रामाणिक आणि नवनिर्मितीची जिद्द असलेले तरुण कार्यकर्ते प्रदीप कात्रट यांचा वाढदिवस २५ ऑगस्ट रोजी असतो. या निमित्ताने त्यांच्या बालपणीचे जिवलग मित्र आणि श्री क्षेत्र महाबळेश्वरचे युवा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र (राजू) पुजारी यांनी खास आठवणींना उजाळा देत त्यांना शुभेच्छा दिल्या.
“प्रदीप लहानपणापासूनच सामाजिक कार्यात रमायचा. गावात कुठलाही उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा उपक्रम असो, त्यात तो नेहमीच आघाडीवर असायचा. बालवयातच त्याने गावातील मुलांना एकत्र करून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करत असे. त्या वेळीच त्याच्या नेतृत्वगुणांची झलक आम्हाला दिस होती. मूर्ती लहान पण कीर्ती महान – हे वाक्य त्याच्यावर तंतोतंत लागू होत होते.”
“संघाच्या कार्याशी लहानपणापासून जोडला गेल्यामुळे त्याच्या मनात समाजकारणाची ठिणगी पेटली होती. मित्रांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी तो नेहमीच प्रयत्नशील राहिचा. शालेय जीवनात शिक्षणाच्या प्रवासात काही अडचणी आल्या, तरी समाजासाठी काहीतरी वेगळं करून दाखवायचं, या उमेदीतून त्याचा प्रवास सुरू झाला.”
२०१५ ते २०१८ या काळातील प्रदीपचे कार्य विशेष अधोरेखित करताना पुजारी म्हणाले – “त्या काळात आम्ही सोबत मिळून श्री क्षेत्र महाबळेश्वर पर्यटनाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा यासाठी अनेक आव्हानात्मक कामे केली. पर्यटन विभाग, महसूल विभाग, पुरातत्त्व खाते तसेच उच्च न्यायालयाशी सातत्याने संपर्क ठेवून विकासासाठी निधी मिळविण्यासाठी प्रदीप सोबत सरपंच सुनील बिरामणे व आम्ही अहोरात्र प्रयत्न केले. गावात पार्किंगची सोय वाढवणे असो, पर्यटकांना थांबवून ठेवणाऱ्या सुविधा उभारणे असो, अथवा स्वच्छता व सोयीसुविधा वाढवणे यासाठी त्याचे योगदान मोठे आहे. संकटांचे डोंगर आले तरी प्रामाणिकपणा आणि संयम यांच्या जोरावर त्याने कामं पुढे नेली.”
“लोकांनी कौतुक करावे म्हणून नव्हे, तर सकारात्मक बदल व्हावा म्हणून चांगले काम करायचे, अशी प्रदीपची भूमिका असते. म्हणूनच आज गावात जी विकासगंगा प्रवाहित झाली आहे, ती त्याच्या नेतृत्वामुळेच. श्री क्षेत्र महाबळेश्वरचा लौकिक वाढवणे, स्थानिक व्यावसायिकांना स्वयंपूर्ण बनवणे, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे – ही त्याची धडपड इतरांनासाठी प्रेरणादायी आहे.”
“शांताराम धनावडे दादा यांच्या प्रेरणेने बालपणापासूनच सामाजिक कार्यातील झपाटलेपणा पाहिला आहे. आजही तीच जिद्द त्याच्यात कायम आहे. श्री क्षेत्र महाबळेश्वरला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ बनविण्याच्या ध्येयाने तो झटतो आहे. गावासाठी अशा समर्पित कार्यकर्त्याचा आम्हाला अभिमान आहे.” हे काम अखंडित चालू ठेवण्यासाठी मकरंद आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला राजेंद्रशेठ राजपुरे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे. नाना वाडेकर, पंढरीनाथ लांगी, जिवनभाऊ महाबळेश्वरकर यांची खंबिर साथ मिळत आहे.
Comments
Post a Comment