देवळे गावातील श्री गणेश मित्र मंडळाचा सामाजिक उपक्रम – लर्निंग लायसन्स कॅम्प व रक्तदान शिबिर समाजापुढे आदर्श
पोलादपूर प्रतिनिधी ( प्रकाश कदम)
पोलादपूर तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखले जाणारे देवळे गाव हे केवळ कृषी पंढरी म्हणूनच नव्हे तर सांस्कृतिक परंपरा जपणारे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. “एक गाव – एक गणपती” ही संकल्पना राबवून देवळे गावातील श्री गणेश मित्र मंडळाने 1994 साली सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. गेली तब्बल 31 वर्षे गावातील युवा मंडळी, मुंबईसह विविध शहरांमध्ये नोकरी-व्यवसाय करणारे ग्रामस्थ, सर्वजण एकत्र येऊन ऐक्याने हा उत्सव साजरा करत आहेत. यंदा या उत्सवाचे ३२ वे वर्ष विविध सामाजिक व नाविन्यपूर्ण उपक्रमांनी साजरे करण्यात आले.
🔹 रक्तदान शिबिराची परंपरा :
गेली चार वर्षे सलग मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. या माध्यमातून शेकडो युवकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.यासाठी विशेष सहकार्य कूपर हॉस्पिटल रक्तपेढीचे लाभले
🔹 पर्यावरणपूरक सजावट :
गणेशोत्सवात मंडळाने दरवर्षी पर्यावरणपूरक सजावटीला प्राधान्य दिले आहे. या वर्षीही मंडप सजावटीत नैसर्गिक साहित्याचा वापर करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.
🔹 लर्निंग लायसन्स कॅम्प – तालुक्यात प्रथमच :
यावर्षीचा सर्वात वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम म्हणजे लर्निंग लायसन्स कॅम्प. पोलादपूर तालुक्यात प्रथमच असा उपक्रम राबवला गेला. अनेक ग्रामीण युवकांना वाहनचालक परवाना काढताना होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन मंडळाने प्रशासनाच्या सहकार्याने हा शिबिर आयोजित केला. त्यामुळे अनेकांना त्यांच्या गावातच लर्निंग लायसन्स मिळवण्याची सुविधा उपलब्ध झाली. ही संधी श्री गणेश मित्र मंडळाच्या वतीने एम मोटार ट्रेनिंग स्कुल ठाणे चे दीपक केसरकर यांनी उपलब्ध करून दिली.
🔹 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप :
गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून मंडळाने ज्ञानवृद्धीला चालना दिली. ग्रामीण भागात शिक्षणाची गती वाढविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
गेल्या तीन दशकांपासून धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांतून गावाला एकत्र आणणारे श्री गणेश मित्र मंडळ देवळेगाव हे गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत आहे. “गणपती बाप्पा मोरया – समाजहिताय मोरया” या घोषणेसह मंडळाने यंदाचा गणेशोत्सव यशस्वीरीत्या पार पाडनार असून, इतर गावांसाठीही हा उपक्रम आदर्शवत ठरला आहे.
Comments
Post a Comment