"मोठ्या नेत्यांवर टीका करायची तर उंचीही मोठी हवी;"
"एकनाथ शिंदे साहेबांचे नाव राजकारणासाठी वापरले तर जशास तसे उत्तर” – सुभाष कारंडे
महाबळेश्वर प्रतिनिधी
प्रतापगड संवर्धनाच्या मुद्द्यावरून झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना संघटक गणेश उतेकर यांनी मावळा प्रतिष्ठान व विरोधी नेत्यांवर केलेल्या वक्तव्यांना महाबळेश्वर तालुका अध्यक्ष सुभाष कारंडे यांनी जोरदार प्रतिवाद करत थेट इशारा दिला की, “मोठ्या नेत्यांवर टीका करण्याची हिम्मत दाखवायची असेल, तर आधी स्वतःची उंची तितकी असावी लागते. अन्यथा उगीच तोंडसुख घेणाऱ्यांना जनता आणि आम्ही दोघेही गप्प बसू देणार नाही.”
“निलेश लंके, शशिकांत शिंदे, जयंत पाटील यांच्यावर टीका? हास्यास्पद!”
कारंडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “लोकनेते निलेश लंके यांची खासदारकी सहज मिळालेली नाही. त्यांनी प्रचंड मेहनत, संघर्ष आणि समाजकार्य करून ती जागा कमावली आहे. शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष असून महाराष्ट्रभर त्यांचे ठोस योगदान आहे. तर जयंत पाटील यांनी अनेक मंत्रीपदे, पक्षाचे प्रदेशध्यक्षपद सांभाळत राज्याच्या विकासासाठी कामगिरी केली आहे. अशा दिग्गज नेत्यांवर टीका करणे म्हणजे स्वतःच्या मर्यादा विसरणे होय. मोठ्या नेत्यांवर बोलायचं तर आधी स्वतःची किमान पंचायत समिती जिंकण्याइतकी ताकद तरी दाखवा.”
“एकनाथ शिंदे साहेब महाबळेश्वरचे सुपुत्र आहेत; पण त्यांचे नावावर राजकारण केलं तर सोडणार नाही”
सुभाष कारंडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आदर व्यक्त करताना म्हटले की, “शिंदे साहेब हे महाबळेश्वर तालुक्याचे सुपुत्र आहेत. त्यांच्या कार्याचा आम्हाला अभिमान आहे. महाबळेश्वरच्या विकासासाठी त्यांनी केलेली कामं जनतेसमोर आहेत. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. पण शिंदे साहेबांचे नाव घेऊन कोणी राजकारण करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल. शिवसेनेतील एखाद्या कार्यकर्त्याने उगीच मोठ्या नेत्यांविषयी अपमानास्पद भाषा वापरली, तर आम्ही गप्प बसणार नाही.”
“गड संवर्धनावरून राजकारण चालणार नाही”
ते पुढे म्हणाले की, “प्रतापगड आणि इतर किल्ले हे महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. त्यावरून राजकारण करणे म्हणजे जनतेच्या भावनांचा अपमान आहे. मावळा प्रतिष्ठानसारख्या संघटनांनी गडावरील कचरा आणि अतिक्रमण याबाबत प्रश्न उपस्थित केले यात काही चुकीचं नाही. लोकांचा सहभाग घेऊन मोहिमा राबवणं ही लोकशाहीतली स्वाभाविक प्रक्रिया आहे. त्याला ‘सरकारविरोधी द्वेष’ म्हणणे हा लोकशाहीचा अपमान आहे. जनता मूर्ख नाही – ती खरे काम करणाऱ्याला साथ देते आणि दिखावा करणाऱ्याला घरी बसवते.”
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ संकपाळ, पारुट गावचे सरपंच सुनील संकपाळ, महाबळेश्वर शहराध्यक्ष बाळासाहेब पवार, अमित जाधव, आशिष चोरगे, नंदकुमार वायदंडे, अमोल काकडे, नयन वन्ने, शहानवाज वारुणकर, हेन्री अण्णा जोसेफ, हरीश गोळे यांच्यासह पाचगणी येथील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment