राजेंद्रशेठ राजपुरे यांच्या मार्गदर्शनातून गणेशोत्सव आरती संग्रहाचे प्रकाशन
सातारा दि. २३ :
गणेशोत्सवाचे औचित्य साधून राजापूर येथील राजपुरे युवा मंच यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या "आरती संग्रहा"चे प्रकाशन करण्यात आले. हा प्रकाशन सोहळा मदत व पुनर्वसन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे जननायक आमदार श्री. मकरंद आबा पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला.
या प्रसंगी सहकार क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्त्व, सहकार रत्न श्री. राजेंद्रशेठ राजपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. गणेशोत्सवात घराघरात, मंडळांमध्ये आणि शाळा-शैक्षणिक संस्थांमध्ये भक्तिगीत आणि आरत्या गाण्याची परंपरा लक्षात घेता युवकांना उपयुक्त ठरेल, असा समृद्ध आरती संग्रह प्रकाशित करण्यात आला आहे.
यावेळी मकरंद आबा पाटील यांनी बोलताना, "गणेशोत्सव हा समाज एकत्र आणणारा आणि संस्कार देणारा सण आहे. अशा उपक्रमांमुळे नवीन पिढीला संस्कृतीची ओळख होते व भक्तीभाव जपला जातो," असे मत व्यक्त केले.
राजेंद्रशेठ राजपुरे यांनी या उपक्रमामागील उद्दिष्ट स्पष्ट करताना सांगितले की, "युवा पिढीने परंपरा आणि संस्कृती टिकवून ठेवण्याबरोबरच समाजकार्यात सहभाग घ्यावा, यासाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाते. आरती संग्रहामुळे अनेकांना गणेशोत्सवात सुलभतेने भक्तीभावाने सहभागी होता येईल."
प्रकाशन कार्यक्रमास स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment