सातारा जिल्हा बँकेची ७५ वी वार्षिक साधारण सभा उत्साहात संपन्न
सातारा जिल्हा बँकेची ७५ वी वार्षिक साधारण सभा उत्साहात संपन्न
प्रतिनिधी | सातारा | दि. १६ ऑगस्ट २०२५
जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील मातृसंस्था म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ७५ वी वार्षिक साधारण सभा शनिवारी उत्साहपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
सभेच्या प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी स्वागत केले. त्यानंतर सेवक, माजी सेवक, मान्यवर तसेच देशासाठी बलिदान दिलेल्या शूर जवानांना २ मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.
या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री व बँकेचे संचालक छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. उत्तर देताना त्यांनी, “बँकेच्या वाटचालीत माजी संचालकांचे मोठे योगदान असून, कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता जिल्ह्याचे व बँकेचे प्रश्न शासनपातळीवर सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहीन,” असे आश्वासन दिले.
बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बँकेच्या प्रगतीचा आलेख सभेसमोर मांडला. स्थापनेपासून बँक सतत नफ्यात असून सलग १८ वर्षे ‘शून्य एनपीए’ राखण्यात यशस्वी झाली आहे. वसुलीचे प्रमाण कायम ९५ टक्क्यांहून अधिक राहिले असून आजवर बँकेस ११८ राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत, असे त्यांनी नमूद केले.
सभेत वार्षिक अहवाल, विविध कर्ज व ठेव योजना तसेच शेतकरी आणि सभासदांच्या हिताच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. उपस्थित सभासदांनी बँकेच्या कामकाजाचे कौतुक करून विविध सूचना मांडल्या.
माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी बँकेच्या गौरवशाली परंपरेचा उल्लेख करत, बदलत्या आर्थिक परिस्थितीत सहकारी बँकांनी शिस्तबद्ध व तंत्रज्ञानाधारित कामकाज करण्याची गरज असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमतेसाठी ठिबक सिंचन, कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारखी आधुनिक साधने उपलब्ध करून देण्याच्या बँकेच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले.
Comments
Post a Comment