दानशूर व्यक्तिमत्त्व मा. श्री. विजय धनावडे यांच्याकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप भेट – शैक्षणिक सहलीसाठीही स्वखर्चाने पुढाकार
गवडी गावचा शैक्षणिक तेजोमय उपक्रम
गवडी (प्रतिनिधी) :
गवडी तालुका जावली येथील दानशूर व्यक्तिमत्व व दूरदृष्टी असलेले युवा उद्योजक मा. श्री. विजय यशवंत धनावडे यांनी पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपत आपल्या गावातील शैक्षणिक क्षेत्रात मोठा हातभार लावला आहे. गवडी शाळेतील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक लॅपटॉप भेट देऊन त्यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणाचे नवे दालन खुले केले.
धनावडे यांच्या या उदात्त कार्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची गोडी लागेलच, शिवाय त्यांच्या शैक्षणिक प्रवासात नवे संधीचे मार्ग मोकळे होतील. गावातील ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने त्यांच्या या पावलाचे मनःपूर्वक स्वागत करत विशेष आभार मानले.
याचबरोबर विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी श्री. धनावडे यांनी रायगड किल्ल्याची शैक्षणिक सहल स्वखर्चाने आयोजित करण्याची तयारी दर्शविली. इतिहासाची प्रत्यक्ष ओळख आणि प्रेरणा देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास गवडी गावचे सरपंच श्री. राजाराम खुडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अंकुश गोळे, पोलिस पाटील श्री. रविंद्र चव्हाण, मुख्याध्यापिका सौ. रत्नप्रभा शेलार तसेच शिक्षक किरण ढेबे उपस्थित होते.
ग्रामस्थांनी यावेळी भावना व्यक्त करताना सांगितले की, “गावातील सामाजिक विकासासाठी युवकांनी अशाप्रकारे पुढाकार घेतला, तर गवडीसारखी गावेही प्रगतीपथावर वेगाने जाऊ शकतात. समाजकारण व दानशूरतेचे सुंदर उदाहरण विजय धनावडे यांनी घालून दिले आहे.”
गावाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी दानशूरतेसोबतच आत्मीयतेने केलेल्या त्यांच्या योगदानाबद्दल सर्वत्र प्रशंसा होत आहे.
Comments
Post a Comment