पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी उपक्रमाचा शुभारंभ साताऱ्यात
सातारा, दि. 26 :
नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घरबसल्या मिळावा, त्यांच्या अडचणी सोडवाव्यात या उद्देशाने राज्यात प्रथमच “पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी” हा उपक्रम सातारा जिल्ह्यात सुरू करण्यात आला आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात झाली असून याचा शुभारंभ दौलतनगर येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे पालकमंत्री देसाई व सात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते झाला.
या प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई, प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री देसाई म्हणाले की, डोंगरी पाटण मतदारसंघात छोट्या कामांसाठी लोकांना शासकीय कार्यालयांत फेरफटके मारावे लागू नयेत, यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. समन्वयकांची टीम प्रत्येक घरी जाऊन अर्ज भरून घेईल, तक्रारींचा पाठपुरावा करेल आणि नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देईल. तांत्रिक अडचणी असल्यास त्यावर जिल्हास्तरीय बैठकीत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्व. बाळासाहेब देसाई यांच्या तत्त्वांचा आदर्श ठेवून लोकांसाठी कार्य करत राहणे हीच खरी बांधिलकी असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय पवार यांनी केले तर आभार विजय शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक, अधिकारी व विविध संस्था उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment