महाबळेश्वरातील भिलार येथील जि.प. प्राथमिक शाळेच्या केंद्रप्रमुख कार्यालयाची भिंत कोसळली
महाबळेश्वर/प्रतिनिधी –
महाबळेश्वर तालुक्यातील भिलार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीत मोठी दुर्घटना टळली आहे. काल दिनांक 20 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा शाळेतील केंद्रप्रमुखांचे कार्यालय असलेल्या खोलीची भिंत अचानक कोसळली.
सुदैवाने हा प्रकार रात्री घडल्यामुळे शाळा परिसरात कोणीही उपस्थित नव्हते, त्यामुळे जीवितहानी टळली. मात्र भिंत कोसळल्याने कार्यालयातील फर्निचर, कागदपत्रे व शैक्षणिक साहित्याचे नुकसान झाले आहे.
सध्या तालुक्यात मुसळधार पावसाचे थैमान सुरू असून, सतत ओलावा व पावसाचे पाणी शाळेच्या जुन्या इमारतीमध्ये झिरपत असल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक कारण मानले जात आहे. स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ शाळा व्यवस्थापनाला आणि शिक्षण विभागाला याची माहिती दिली.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, "ही इमारत बर्याच वर्षांपूर्वी बांधलेली असून गेल्या काही दिवसांपासून ती धोकादायक स्थितीत आहे. वेळेत दुरुस्ती व देखभाल न झाल्याने ही घटना घडली. सुदैवाने विद्यार्थ्यांचे प्राण वाचले, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता."
ग्रामस्थ व पालकांनी जिल्हा परिषद व शिक्षण विभागाकडे शाळेच्या इमारतीची तातडीने दुरुस्ती करून सुरक्षित वर्गखोल्या उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, पंचायत समिती व महाबळेश्वर शिक्षण विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, नुकसानाचे पंचनामे करून तातडीच्या दुरुस्तीची कार्यवाही सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.
Comments
Post a Comment