गणरायाच्या आगमनाने कोकणात गावोगावी उत्साह – बाजारपेठांमध्ये वर्दळ, घराघरात गणरायाची स्थापना




पोलादपूर प्रतिनिधी : प्रकाश कदम

कोकणवासीयांच्या सर्वांत जिव्हाळ्याच्या सणाला – गणेशोत्सवाला – सुरुवात झाली असून रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यासह कोकणात गावोगावी गणरायाच्या स्वागताचा जल्लोष सुरू झाला आहे. २७ ऑगस्ट २०२५ रोजी मंगलमय वातावरणात गणरायाचे आगमन झाले.

तालुक्यात यंदा ७ सार्वजनिक मंडळे आणि तब्बल १,८१० घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तसेच ५३० गौरींचे आगमन ३१ ऑगस्ट रोजी होणार असून गावागावात तयारी जोरात सुरू आहे.


गावागावात नवचैतन्य

गणरायाच्या आगमनामुळे गावातील ओस पडलेली वाड्या–वस्ती गजबजून गेली आहे. पुणे–मुंबईसारख्या शहरांत नोकरी-उद्योग करणारे चाकरमानी आवर्जून गावी परतले आहेत. त्यामुळे वर्षभर बंद असलेल्या घरांना ताळे काढले गेले असून घराघरात आनंदाचा माहोल निर्माण झाला आहे. लहानगे मुलं गावच्या अंगणात खेळू लागली, तरुणांनी मित्रपरिवारासोबत गप्पांची मैफिली रंगवल्या आणि वृद्धांना मुलाबाळं व नातवंडे सोबत आल्याने समाधान लाभले आहे.


बाजारपेठांत गजबज – उत्सवाला व्यापारी रंग

गणेशोत्सवानिमित्त पोलादपूरसह आसपासच्या बाजारपेठा उजळून निघाल्या आहेत. मोदक, मिठाई, सजावटीचे साहित्य, लाईट मालिका, गणेशमूर्ती यांची दुकाने फुलली आहेत.

  • साबळे गणेशमूर्ती कारखाना (पोलादपूर), कापडे येथील मूर्ती कारखाना तसेच पेण तालुक्यातील गणेशमूर्ती पोलादपूरात विक्रीसाठी उपलब्ध होत्या.
  • गावोगावी मंडप सजवून गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी मंडळे सज्ज झाली आहेत.

धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम

तालुक्यातील सार्वजनिक मंडळांनी सलग ५ दिवस कीर्तन, प्रवचन, भजन यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यासोबतच प्रबोधनात्मक आणि लोकोपयोगी उपक्रम राबवले जात असून, उत्सवाला सामाजिक व शैक्षणिक स्वरूप मिळत आहे.


कोकणाच्या संस्कृतीला बहर

कोकणातील प्रत्येक गावी गणेशोत्सव म्हणजे एक संस्कृतीचा, ऐक्याचा आणि आनंदाचा महोत्सव ठरतो. गावातील निसर्गरम्य वातावरणात हलक्या सरींच्या साक्षीने गणरायाचे आगमन झाल्याने ग्रामस्थ सुखावले आहेत. “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात व आरतीच्या आवाजात गावागावात सणाचे वेध लागले आहेत.

गावांना खऱ्या अर्थाने गावपण लाभले असून गणरायाच्या आगमनाने कोकण उजळून निघाले आहे.


Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl