मुसळधार पावसाचा इशारा : साताऱ्यातील शाळा दोन दिवस बंद.
सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून, हवामान विभागाने येत्या दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तातडीने निर्णय घेत बुधवार दि. २० ऑगस्ट व गुरुवार दि. २१ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
जिल्हा शिक्षण विभागाचा आदेश
जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अमोल काटवरे यांनी या संदर्भात आदेश जारी केले असून सातारा, कराड, वाई, पाटण, जावळी व महाबळेश्वर या तालुक्यातील सर्व शाळा दोन दिवस बंद राहतील. दरम्यान, कोरेगाव, खटाव, खंडाळा, माण व फलटण या तालुक्यांतील परिस्थितीचा आढावा घेऊन स्थानिक गटविकास अधिकारी शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेणार आहेत.
पूरस्थितीचा वाढता धोका
सातारा जिल्ह्यातील नद्या-नाले तुडुंब भरले आहेत. कोयना, कण्हेर, धोम, कास व इतर धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली असून, नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थितीचा धोका वाढत आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, पालकांनी मुलांना घराबाहेर अनावश्यक फिरू देऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शाळांना सुट्टी असली तरी शिक्षण विभागीय अधिकारी व शिक्षकांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. सुट्टी संपल्यानंतर शाळांचे नियमित कामकाज सुरू होईल, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
Comments
Post a Comment