"प्रतापगडावर कचरा दाखवून राजकारण; मावळा प्रतिष्ठानची मोहिम सरकारविरोधी द्वेष पसरविणारी” – गणेश उतेकर
महाबळेश्वर प्रतिनिधी
प्रतापगडावरील अतिक्रमण आणि कचरा हटवून गडाला नवसंजीवनी देण्याचे मोठे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारने केले असताना, काही तथाकथित सामाजिक संघटना आणि विरोधी नेते आता “गडकोट पण” मोहिमेच्या नावाखाली केवळ राजकीय दिखावा करत असल्याचा जोरदार आरोप शिवसेना संघटक श्री गणेश उतेकर यांनी केला.
श्री. उतेकर म्हणाले की, “अनेक वर्ष गडावर कचरा आणि अतिक्रमण साठून राहिले. त्या काळात ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी केवळ न्यायालयीन बाबी दाखवून वेळ मारून नेला. मात्र शिंदे-फडणवीस-पवार यांच्या युती सरकारने खरी साफसफाई केली आणि प्रतापगडाचे पावित्र्य पुन्हा उजळवले. विरोधकांकडे दाखवायला काम नाही म्हणून आता ते बनावट मोहिमा राबवून लोकांची दिशाभूल करत आहेत.”
विशेषत: मावळा प्रतिष्ठानवर निशाणा साधत ते म्हणाले की, “ही संघटना सामाजिक कार्याच्या नावाखाली सरकारविरुद्ध द्वेष पसरविण्याचे काम करत आहे. प्रत्यक्ष संवर्धनाच्या कामात काहीही योगदान नसताना फक्त गोंधळ माजविणे, सरकारविरोधी वातावरण तयार करणे, हेच त्यांचे उद्दिष्ट आहे. गड संवर्धन करताना राजकारण टाकले नाही पाहिजे. तेव्हाच बारापगड जाती घेऊन काम करण्याचा आनंद मिळतो. पण मावळा प्रतिष्ठानला खरी शिवसेवा नको, तर सरकारविरोधी कुरघोडी हवी आहे.”
गणेश उतेकर यांनी पुढे सांगितले की, “आज पावसाळ्यात गवत, शेवाळ साचले आहे. थोडी उघडीप मिळाली की शासनाचे कर्मचारी गवत व मानवनिर्मित कचऱ्याचे संपूर्ण विलगीकरण करणारच आहेत. मग प्रश्न असा आहे की या संघटना नेमके कोणासाठी राजकारण करत आहेत? गडावर जय शिवराय म्हणत खोटा दिखावा करण्यापेक्षा शासनाबरोबर खऱ्या कामात सामील व्हावे.”
शिवसेनेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची तिकडी महाराष्ट्रातील सर्व गड-किल्ले संवर्धनासाठी ठोस योजना राबवित आहे. पालकमंत्री शंभुराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली प्रतापगड संवर्धन समिती गडाला जागतिक वारशाचा दर्जा मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे. “विरोधकांनी फक्त पावसाळी सहली काढून, मशाल मोर्चा काढून किंवा सेल्फी पोस्ट करून लोकांची दिशाभूल करू नये. गड संवर्धनासाठी खरी कामगिरी करायची असेल तर शासनाबरोबर खांद्याला खांदा लावून उभे राहावे,” असेही उतेकर म्हणाले.
त्यांनी ठामपणे नमूद केले की, “आज महाराष्ट्राची अस्मिता असलेले श्रीमंत छत्रपती घराणे हे युतीसोबत ठामपणे उभे आहे. उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे भोसले स्वतः गड संवर्धनात पुढाकार घेत आहेत. त्यामुळे ‘गडकोट पण’ नावाने सरकारविरोधी मोहिमा राबवणाऱ्यांची पोलखोल आता जनतेसमोर झाली आहे.”
या पत्रकार परिषदेला विठ्ठल मामा शिंदे, विशाल संकपाळ, संजय मोरे, संभाजी भिलारे, आनंद धनावडे, अजित संकपाळ, राम संकपाळ, मंगेश संकपाळ, किसन शिंदे, भीवराम मोरे, शंकर कदम, प्रकाश जाधव, राजू कदम, सचिन कदम, आवेश ढेबे, चंद्रकांत संकपाळ, रामभाऊ शेलार, किशोर जंगम, अंकुश कदम आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
👉 एकूणच, गणेश उतेकर यांनी स्पष्ट केले की, प्रतापगडावर अतिक्रमण काढून खरी स्वच्छता करण्याचे काम युती सरकारने केले आहे, आता विरोधक केवळ ‘गडकोट पण’ मोहिमेच्या नावाखाली राजकीय खेळ करत आहेत. महाराष्ट्राच्या गडकोटांवरून राजकारण करणाऱ्यांना जनता आता माफ करणार नाही.
Comments
Post a Comment