प्रदीप कात्रट : गावाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारा तरुण कार्यकर्ता
क्षेत्र महाबळेश्वर प्रतिनिधी
गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे, नवनिर्मितीसाठी धडपडणारे, जिद्दी आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रदीप कात्रट. स्वच्छ प्रतिमा, प्रामाणिकता आणि विकासाविषयीची दूरदृष्टी या गुणांमुळे ते स्थानिक पातळीवर एक आश्वासक चेहरा म्हणून ओळखले जातात.
लहानपणापासूनच आपल्या गाव-परिसराबद्दल काहीतरी करण्याची उमेद त्यांच्या मनात होती. महाबळेश्वरला दर्जेदार पर्यटन स्थळ म्हणून ओळख मिळावी, स्थानिकांना आर्थिक उन्नतीची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी त्यांचा सतत अभ्यास आणि प्रयत्न सुरू असतो. पर्यटक जास्त वेळ या परिसरात थांबले पाहिजेत, त्यातून स्थानिक अर्थकारणाला चालना मिळाली पाहिजे, यासाठी ते नेहमीच धडपड करतात. कृष्णामाई मंदिर परिसरासह पर्यटकांना आवश्यक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे, स्थानिक व्यावसायिकांची आर्थिक प्रगती साधणे या भावनेतून ते निस्वार्थीपणे कार्यरत आहेत.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मुंबई उच्च न्यायालयासोबतच पर्यटन विभाग, पुरातत्त्व खाते, महसूल विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी सतत संपर्क ठेवून निधी मंजुरीसाठी केलेली धडपड उल्लेखनीय आहे. पार्किंगची उपलब्धता वाढवणे, दिशादर्शक फलक उभारणे, रस्ते सुशोभीत करणे, परिसर स्वच्छ राखणे या उपक्रमांमुळे आज पर्यटक या भागात जास्त वेळ घालवतात, परिणामी स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत.
श्री. शांताराम धनावडे दादा यांच्या प्रेरणेने ग्रामपंचायतीत काम करत असताना त्यांनी स्वच्छता, शैक्षणिक सुविधा, परिसराच्या महतीचा प्रचार व प्रसिद्धी, धार्मिक पर्यटन वृद्धी, खेळाडूंना प्रोत्साहन अशा विविध क्षेत्रांत सक्रिय सहभाग नोंदवला. त्यांच्या कामातून अभ्यासू वृत्ती, चिकाटी आणि नेतृत्वगुणांचे दर्शन घडले. समाजभूषण बाळासाहेब भिलारे दादा यांच्या कृपाशीर्वादाने संजय गायकवाड यांनी सर्वप्रथम तालुका समन्वय समितीत प्रवीणशेठ भिलारे यांच्यासोबत काम करण्याची संधी दिली. यानंतर राजेंद्रशेठ राजपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या विकासाची वाटचाल त्यांनी सुरू ठेवली.
आज प्रदीप कात्रट यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पर्यटन वृद्धीसाठी, जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी आणि सर्वांगीण पर्यटन विकास साधण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहोत. गावासाठी प्रेरणादायी ठरणारा हा तरुण कार्यकर्ता म्हणजे प्रदीप कात्रट.
---
Comments
Post a Comment